अरुणावतीचा पुन्हा आर्णीकरांना ७०० घरांना पाण्याचा वेढा
अरुणावती नदीच्या काठावरील आर्णीकरांना पुन्हा पुराचा तडाखा बसला असून गावातील मध्यभागी असलेल्या नाल्यालाही पूर आल्याने सुमारे ७०० घरात पाणी शिरल्याने व पाण्याचा वेढा बसल्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाकडून आर्णीकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आर्णी शहराला नदी व नाल्याचा वेढा असल्याने पुराचा नेहमीच तडाखा बसतो. दरम्यानु, या संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्य़ातील मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
सुमारे १८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज आर्णीकरांचे जीवन अस्ताव्यस्त झाले. मुख्य व्यापारपेठेपासून तर मोमीनपुरा, मालानीनगर, अमराईपुरा, दुबई, शास्त्रीनगर, प्रेमनगर, सेवानगर, दुर्गा मंदिर परिसरात देऊरबाग भागात पुराचे पाणी शिरल्याने एकच हाहाकार झाला. अरुणावती नदीच्या पुलावर ३ फुटावरून पुराचे पाणी वाहत असून नागपूर-तुळजापूर हा महामार्ग १० तासांपासून ठप्प झाला आहे. अरुणावती नदीच्या कोपामुळे आर्णीकर भयभीत झाले असून पाऊस सुरूच राहिला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १८ तासांच्या पावसामुळे माहूर, दारव्हा, यवतमाळ, नागपूर, उमरखेड, पुसद, नांदेड १० तासांपासून वाहतूक ठप्प झाली असून त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. शेतीलाही या पुराचा तडाखा बसल्याने शेतकरीसुद्धा भयभीत आहे. १८ तासात ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ४५० मि.मी. पावसाची नोंद झाल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, उपनगराध्यक्ष आरीजबेग, सभापती जावेद सोलंकी, तसेच तहसीलदार नरेंद्र दुबे, ठाणेदार सर्जेराव गायकवाड आदींनी पूरग्रस्तांना भेटी देऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वरील मंडळींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सध्या नायब तहसीलदार डी.जे. मोर परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पहिला पूर १५ जूनला आला होता. त्यातही मोठय़ा प्रमाणात आर्णीकरांचे नुकसान झाले होते. आता पहिल्या पुरानंतर दुसऱ्या पुरातही मोठे नुकसान झाल्याने आर्णी येथील पूरग्रस्त हतबल झाले आहेत. शासनाने आतातरी त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशीही मागणी पुन्हा पुढे आली आहे.
चार दिवस धो-धो कोसळून तीन दिवसांची विश्रांती घेतल्यांनतर वरुणराजाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने आधीच अस्ताव्यस्त झालेल्या जनजीवन अधिकच त्रासदायक केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून झड सुरू आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील अरुणावती, अडाण, पूस, उध्र्व पनगंगा आणि बेंबळा ही मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. लहानमोठी धरणेसुध्दा तृप्त होऊन वाहत आहेत. मात्र. यवतमाळ शहर व लगतच्या मोहा, लोहारा, उमरसरा, वडगाव, िपपळगाव, वाघापूर, गोदणी या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह या दोन्ही धरणाच्या ओव्हर फ्लो होण्याची वाट जीवन प्राधिकरणच नव्हे, तर शहर आणि गावकरीही पाहत आहेत. निळोणा धरणात ३.१० दशलक्ष घनमीटर आणि चापडोह धरणात ९.५ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे जेव्हा की, निळोणा धरणाची क्षमता २३.७० दशलक्ष घनमीटर आणि चापडोहची क्षमता १७.४० दशलक्ष घनमीटर आहे. सर्वाधिक पावसाची नोंद आर्णी तालुक्यात, तर सर्वात कमी पावसाची नोंद झरीजामणी तालुक्यात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ाची २४ जूनपर्यंतची पावसाची सरासरी ६१ टक्क्यांनी वाढली आहे. जिल्ह्य़ाच्या सोळा तालुक्यात ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या असल्या तरी खरीप पिकांचे उद्दिष्ट ८ लाख ६३ हजार क्षेत्रांचे आहे. त्यामुळे पेरण्या मधेच अडकल्या आहेत. जिल्ह्य़ात ८६ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन आणि सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली असली तरी सोयाबीनचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा