विदर्भातील सात जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. संकटावर संकटे येत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी त्यांची अवस्था झाली आहे.
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ांना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चिंब केले आहे. गेल्या पंधरवडय़ात पावसाने उसंत घेतल्याने विशेषत: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशीम जिल्ह्य़ांतील शेतक ऱ्यांनी खरिपातील उडीद, मूग व सोयाबीन या पिकांची काढणी सुरू केली होती. सोयाबीनला सध्या बाजारपेठेत भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा वाटत असतानाच पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांच्या गंज्या झाकण्यासाठी आणि काढलेले पीक घरी आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
शेतातच उघडय़ावर पडलेले पीक पावसाने सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. दोन महिन्यात अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळाली तर नाहीच, पण तोंडी आलेला घास पुन्हा हिसकून घेतला जात आहे, अशा बिकट अवस्थेत शेतकरी सापडलेला आहे.
विदर्भात नागपूर जिल्ह्य़ात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक २१.७ मि.मी., गोंदिया जिल्ह्य़ात १९.२, यवतमाळ १८.२, चंद्रपूर ८, ब्रम्हपुरी ६.७, अकोला ३.४, वाशीम २.६ व वर्धा जिल्ह्य़ात २ मि.मी. पाऊस  झाला. आधीच सरासरीच्या दुप्पट पाऊस झालेला असताना आता होत असलेला पाऊस जमिनीची अधिक धूप करणारा ठरत आहे. ज्वारी, कापूस व धान पिकांनाही या पावसाचा फटका बसत आहे. शेतीच्या आंतरमशागतीची कामेही थांबली आहेत.
अतिवृष्टीचा इशारा
ओडिशा आणि लगतच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी पुढील दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने वर्तविली आहे. पावसामुळे  किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून वातावरण सर्दावलेले आहे. आणखी अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांच्या संकटात भर पडणार आहे.

Story img Loader