दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकर्सची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. तथापि, मंगळवेढा व सांगोला या दोन्ही तालुक्यांत वरुणराजाची वक्रदृष्टी कायम असल्यामुळे तेथील टँकरची संख्या कमी होऊ शकली नाही.
गेल्या सलग दोन वर्षांत पाऊस न झाल्याने जिल्ह्य़ातील जनतेला दुष्काळाशी सामना करावा लागला होता. यंदा उन्हाळ्यात उजनी धरणातील पाण्याचा साठा तळाला जाऊन वजा ५० टक्क्य़ांपेक्षा खाली गेला होता. तर पाणी पुरवठय़ासाठी वापरण्यात येणा-या टँकरची संख्या सातशेच्या घरात गेली होती. मात्र सुदैवाने यंदा सुरुवातीपासून वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे जिल्ह्य़ातील दुष्काळाचे चित्र हळूहळू बदलत गेले. १ जूनपासून ते आजतागायत दोन महिन्यांत जिल्ह्य़ात एकूण २८०७ मिलिमीटरप्रमाणे सरासरी २५५.०९ मिमी पाऊस पडला. पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता ती ५२.२० इतकी आहे. जिल्ह्य़ातील संपूर्ण पावसाळ्यात एकूण ४८८.८३ मिमी सरासरीप्रमाणे एकूण ५३७७ मिमी इतका पाऊस पडतो. त्यापैकी निम्मा पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे पाण्यासाठी वापरल्या जाणा-या टँकरची संख्या निम्म्याने घटली आहे. आजअखेर जिल्ह्य़ातील ३०५ गावे व १६२३ वाडय़ा-वस्त्यांवरील बाधित सहा लाख ५० हजार लोकसंख्येसाठी ३६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात मंगळवेढा येथे सर्वाधिक ८५ तर सांगोल्यात ७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मंगळवेढय़ात आतापर्यंत केवळ १५७.४५ मिमी म्हणजे जेमतेम ३५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तर सांगोला तालुक्यातही जवळपास हीच स्थिती आहे. याठिकाणी आतापर्यंत १४९.४४ मिमी म्हणजे केवळ ३८.६५ टक्के एवढा पाऊस होऊ शकला. जिल्ह्य़ात सर्वाधिक ३४७.९१ मिमी (७४.७२ टक्के) पाऊस झाल्यामुळे तेथील टँकरची संख्या आता ९५ वरून ५५ वर आली आहे.
वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे सोलापुरात टँकर निम्म्याने घटले
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकर्सची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे.
First published on: 05-08-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain has reduced number of water tankers in solapur