वादळीवाऱ्यासह औरंगाबाद शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. एवढी की, शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील अध्र्यापेक्षा अधिक भागात सुमारे अडीच तास वीज नव्हती. वाऱ्याचा वेग पावसाला पुढे सरकवत होता. गणेशचतुर्थीपासून दररोज पाऊस हजेरी लावून जातो. मात्र, आज झालेल्या पावसाने वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे वीजपुरवठय़ावर परिणाम झाल्यामुळे उद्या शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेला जाहीर करावे लागले.
दुपारी साडेचारच्या सुमारास आभाळ भरून आले. पावसाला सुरुवात झाली, तीच वादळी वाऱ्याने. जोराचा पाऊस झाला. या पावसात एन-२ मधील शाळेजवळ झाड पडले. ते नेमके वीजपुरवठा करणाऱ्या ११केव्ही दाबाच्या तारेवर पडले. परिणामी जाधववाडी, स्नेहनगर, पेठेनगर, सुर्वेवाडी, हर्सूल, दशमेशनगर, एमआयडीसी, सहारा सिटी, बीड बायपास भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत तो पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. शासकीय निवासस्थानाजवळील स्नेहनगर भागातही झाड कोसळले. तर काही ठिकाणी खांब वाकले. काही गणेशोत्सव मंडळाचे मंडपही कोसळले. फारोळा येथील पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने जायकवाडीतून पाणी उपसा करणे बंद झाले. शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे. पावसाच्या जोर तसा कमी होता, पण वारा अधिक असल्याने मोठे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. विमानतळ परिसरातील पर्जन्यमापकात केवळ ४.१ मि.मी. पावसाची नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाने दाणादाण!
वादळीवाऱ्यासह औरंगाबाद शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. एवढी की, शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील अध्र्यापेक्षा अधिक भागात सुमारे अडीच तास वीज नव्हती.

First published on: 14-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in aurangabad