२४ तासांत सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद
उन्हाळ्यात पाऱ्याने उच्चांक गाठल्यानंतर वरुणाराजाने विदर्भाला दिलासा दिला आहे. सोमवारी रात्रभर विदर्भाच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये दणदणीत पाऊस कोसळला. नागपूर विभागातील सहा तहसिलींमध्ये विक्रमी पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तहसिलीत २४ तासांत सर्वाधिक २१० मिमी पावसाने दणकेबाज हजेरी लावली. भामरागडसह अहेरीत ६५, एटापल्लीत ६७ आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे ७०.१ तर वध्र्याच्या सेलूत ६८.३ आणि चंद्रपूर येथे ६८ मिमी पाऊस पडला. गेल्या १ जूनपासून आतापर्यंत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील सरासरी पावसाच्या नोंदीत नागपूर जिल्ह्य़ात सर्वाधिक २११.३९, वर्धा २४२.४५, भंडारा २२३.७७, गोंदिया १८७.४८, चंद्रपूर २९२.५४ आणि गडचिरोलीत ३९३.६८ मिमी एवढा पाऊस बरसला.  
पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नागपूर विभागात धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ही पातळी एवढी वाढलेली नव्हती. विदर्भातील धरण साठय़ांमध्ये २४ जूनपर्यंत २९८ दशलक्ष घमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. नागपूर जिल्ह्य़ात मान्सूनच्या आगमनापासून दखल घेण्याजोगा पाऊस सोमवारी झाला. जिल्ह्य़ातील २२८ खेडी पूरप्रवण क्षेत्रात असल्याने प्रलयाच्या संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावली उचलली आहेत. कुही, कामठी आणि भिवापूर तालुक्यातील ही खेडी दर पावसाळ्यात पुराचा सामना करतात. मोठय़ा प्रमाणात शेती आणि घरांच्या पडझडीचे आर्थिक नुकसान गावकऱ्यांना सोसावे लागते. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील १३ तहसीलींमध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून २४ तास कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे. गावक ऱ्यांचे जीवित वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून संकटग्रस्त गावक ऱ्यांच्या मदतीसाठी ७०० जीवन रक्षक सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी बोटी,  लाईफ जॅकेट्स, पॉवरफूल सर्च लाईट आणि व्हॅन राहणार आहेत.  
अग्निशमन दल आणि गृह रक्षक दलाचीही मदत घेण्यात येणार असून नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पावसाळी परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने हाय टेक उपकरणे सज्ज केली आहेत. नागपूर जिल्ह्य़ात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शेजारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. दोन्ही राज्यातील नद्यांमुळे नागपूर जिल्ह्य़ात पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यास योजावयाच्या उपायांवरही बैठकीत चर्चा झाली. याशिवाय नियंत्रण कक्षाचे क्रमांक आसपासच्या खेडय़ातील गावकऱ्यांना देण्यात आले असून २४ तास दक्ष राहण्याचे सक्त आदेश कक्षातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्य़ातील नाग नदी, पिली नदी आणि नाले असलेल्या खोलगट भागांमध्ये पुराचा धोका उद्भवलेला आहे. यात झिंगाबाई टाकळी, नारानारी, पारडी, पुनापूर, अंबाझरी, बिनाकी, भरतवाडा, वाठोडा, मानकापूर, कळमना, वंजारा, बीडीपेठ या वस्त्या अधिक धोकाप्रवण आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील बोरी, वारंगा, किन्हाळा, माकडी, घोगली, हुडकेश्वर, विहीरगाव, आष्टा, सालई दोधनी, हिंगणा, नीलडोह, डिगडोह, गुमगाव, कोटेवाडा, शिरपूर आणि अन्य खेडय़ांना पुराचा संभाव्य धोका असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा