जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा, साखरखेर्डा, धाड, चांडोळ व बुलढाणा परिसराला सोमवारी रात्री सातपासून दहा वाजेपर्यंत मान्सूनपूर्व व वादळी पावसाने चांगलेच झोडपले. यात शाळा व घरांचे नुकसान झाले असून छतावरील दगड डोक्यात पडून तिघे जखमी झाले.
बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे वादळी वाऱ्यामुळे शाळा व अनेक घरांच्या छतांवरील टीनपत्रे उडाले. परिसरात ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. डोक्यावर दगड पडल्यामुळे तीन जण जखमी झाले. साहेबराव नेवरे, रेखा फोलाने, आरिफ खान अशी जखमींची नावे आहेत. बुलढाणा शहर व परिसरात रात्री साडेदहा वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मान्सूनपूर्व पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सोमवारी संध्याकाळी पाचनंतर सिंदखेडराजा, साखरखेर्डा व लोणार शहर परिसरात विजेचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. साखरखेर्डा, सिंदखेडराजा व लोणार परिसरात सोमवारी रात्री सातपासून दहा वाजेपर्यंत मुसळधार वादळी पाऊस झाला. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची धांदल उडाली होती. वादळी वाऱ्यामुळे परिसरात कुठलेच नुकसान झाले नाही.

Story img Loader