* शहर जलमय, मदतकार्यात अडथळे
* इरईचे दरवाजे उघडले, वस्त्या पाण्याखाली
* सर्व शाळांना सुटी जाहीर

शुक्रवारच्या विक्रमी मुसळधार पावसाने विस्कटलेले संसार व व्यापाराची घडी नीट बसण्यापूर्वीच आज सकाळपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा व शहराला चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे शहर जलमय झाले असून महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी या मुख्य रस्त्यांची अवस्था मुख्य नाल्यांसारखी झाली आहे. या पावसामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या मदतकार्यात अडथळे आले आहेत. इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने नदी काठावरील वस्त्या पुन्हा पाण्याखाली आल्या आहेत. पावसामुळे सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी या जिल्ह्य़ाला व शहराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. अवघ्या चार तासात २८८ मि.मी. पाऊस झाल्याने शहरातील बहुतांश वस्त्या पाण्याखाली आल्या होत्या. विक्रमी मुसळधार पावसाने २ हजार घरे पडली, तर ५० हजार एकरातील पीक वाहून गेले. सहा जणांचा मृत्यू झाला, तर व्यापारी व झोपडपट्टयांमधील लोकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. यानंतर शनिवार व रविवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर विस्कटलेले संसार व व्यापाराची घडी नीट बसविण्याचे व लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतकार्याला सुरुवात झालेली असतांनाच आज सकाळी ९.३० वाजतापासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटात मुख्य मार्गावर सर्वदूर पाणी साचले. शहरातील मुख्य रस्ता असलेले महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग पाण्याखाली आले. या दोन्ही रस्त्यांची अवस्था शहरातील दोन प्रमुख नाल्यांसारखी झालेली होती. मुख्य मार्गावरील लोकमान्य टिळक विद्यालय, नोकिया शोरूम, लक्ष्मीनारायण मंदिर, श्री कलेक्शन, बॅंक ऑफ इंडिया, चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालय, हॉटेल पंजाब, जयंत टॉकीज, श्री टॉकीज, आझाद बाग, आनंद संकुल पाण्याखाली आले. तेथे जवळपास ३ ते ४ फूट पाणी होते. गांधी चौक ते जयंत टॉकीजपर्यंत पाणी असल्याने स्कुल बस, चारचाकी व दुचाकी वाहने पाण्यात फसल्याने या मार्गावर वाहनांची रांग लागली होती. हीच परिस्थिती कस्तुरबा मार्गावर होती. ज्युबिली हायस्कुल, सिटी हायस्कुल, कस्तुरबा चौकात पाणी साचले होते, तर रहमतनगर, सिस्टर कॉलनी, वडगाव, स्वावलंबीनगर, नगिनाबाग, महसूल कॉलनी, ठक्कर कॉलनी, जगन्नाथबाबानगर, उत्पादन शुल्क विभागाची कॉलनी, तसेच नदी काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते.
शुक्रवारच्या पावसाने सतर्क झालेल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानातील माल पहिलेच इतरत्र हलविल्याने नुकसान कमी झाले असले तरी दुकानात पाणी शिरल्याने व्हायचे ते नुकसान झालेच. कस्तुरबा मार्गावरील भारतीय स्टेट बॅंक व बॅंकेच्या एटीएम मशिनमध्ये पाणी शिरल्याने ही मशिन बंद करण्यात आली होती. शहरातील शास्त्रीनगर, वडगाव, बापटनगर, इंदिरानगर, श्यामनगर, संजयनगर, मूल मार्ग या भागातही पावसाच्या पाण्याने शिरकाव केला होता. मुसळधार पावसाने शहरातील नदी नाले तुडूंब भरून वाहत असून दोन दिवसाच्या उघडिपीनंतर संसाराची घडी नीट बसण्यापूर्वीच पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यमवर्गीय व गरीब लोकांची अवस्था अतिशय वाईट असून घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक साहित्य ओले झाल्याने नुकसानीचा आकडा कोटय़वधीच्या घरात आहे. पावसाने उघडीप दिल्याने जिल्हा प्रशासन व मनपाच्या संयुक्त पथकाच्या वतीने पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षणाचे काम आजपासून सुरू करण्यात आले होते. मात्र, सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने सर्वेक्षणाच्या व मदतकार्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे काम आजच्या दिवस थांबविण्यात आले आहे.
आजच्या पावसाने पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडली असून जवळपास एक लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षणाचे काम सुरू असले तरी पूर्ण सर्वेक्षण होण्यास आणखी पंधरा दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काल आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने पूरग्रस्त भागात मदत कार्याला सुरुवात केली होती. परंतु, आजच्या पावसाने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. तिकडे इरई धरण तुडूंब भरले असल्याने सातही दरवाजे एक मिटरने उघडण्यात आले आहे. त्याचा परिणाम नदी काठावरील बहुतांश वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर, अति. जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप बडकेलवार, मनपा आयुक्त प्रकाश बोखड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

रेल्वेचा प्रवाशांना फटका
चंद्रपूर-वर्धा-मुंबई या मार्गावरील रेल्वे लाईन सुरळीत असतांनाही रेल्वे व्यवस्थापनाने मुंबई-सेवाग्राम ही रेल्वे गाडी भुसावळ-इटारसी-बैतूल-नागपूर या मार्गाने सोडल्याने चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. या भागातील ४०० प्रवाशांनी काल रविवारी रेल्वे प्रशासनाला चंद्रपूर-मुंबई मार्ग सुरळीत असतांना याच मार्गावरील एखाद्या रेल्वेला चंद्रपूरचे सहा डबे जोडण्याची विनंती केली. यावेळी प्रवाशांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला, तसेच खासदार हंसराज अहीर यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खासदार अहीर यांनीही रेल्वेचे नागपूरचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्याशी रात्री भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. केवळ नागपूर-वर्धा रेल्वे मार्ग नादुरुस्त आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या प्रवाशांसाठी तशी व्यवस्था करणे सोयीस्कर होते. परंतु, भुसावळ येथील रेल्वे अधिकारी ऐकायला तयार नसल्याने चंद्रपूरच्या ४०० प्रवाशांना नाहक नागपूर येथे उतरविण्यात आले. आज ते सारे बसने चंद्रपूरला परतले. रेल्वेच्या गलथान कारभारामुळे या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करणार
विक्रमी मुसळधार पावसामुळे वाईट अवस्थेत सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ाचा दौरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार व इतर पक्षाच्या आमदारांनी केली, तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून जिल्ह्य़ातील परिस्थितीची विस्तृत माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शनिवार व रविवार, असे दोन दिवस पूरग्रस्त जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिल्याने शनिवार व रविवारी मुख्यमंत्री चंद्रपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Story img Loader