आठ दिवसाच्या उसंतीनंतर सोमवार, २४ जूनला रात्री ८ वाजतापासून २ तासापर्यंत संपूर्ण जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस बरसला. यात गोरेगाव, गोंदिया, तिरोडा, आमगाव व सडक अर्जुनी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसाने रिपरिप सुरू केली ती आज दिवसभर सुरूच होती. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्य़ात पडला आहे. वरुणदेवाने दिलेल्या उसंतीमुळे बळीराजा पेरणी व नांगरणीच्या कामाला लागलेला होता. मात्र, रात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे खोळंबलेली कामे शेतातील पाणी ओसरल्यानंतरच पुन्हा सुरू होणार असल्याचे चित्र आहे. गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, आमगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील आठ तालुक्यात एकूण ४९०.०३ मि.मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ६१.२८ मि.मी. आहे. २५ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे- गोंदिया- ६९.८ मि.मी., गोरेगाव- ११३ मि.मी., तिरोडा- ८२ मि.मी., अर्जुनी-मोर.- ३४ मि.मी., देवरी- ३२ मि.मी., आमगाव- ७२.२ मि.मी., सालेकसा- ४५ मि.मी., सडक-अर्जुनी- ४२.३ मि.मी., असा एकूण ४९०.३ मि.मी. पाऊस पडला.