पावसाने यंदा हिंगोलीवर चांगलीच कृपा केली आहे. वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली. मात्र, अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळनंतर १२ तासांत तब्बल १३६ मिमी पावसाची नव्याने नोंद झाली. परिणामी शेतकऱ्यांचे उरले-सुरले सोयाबीन पीकसुद्धा हातचे गेले. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्य़ात अतिवृष्टीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुनर्वसन मंत्र्याच्या आदेशावरून जिल्हा प्रशासन पीक नुकसानीचे तिसऱ्यांदा सरसकट सर्वेक्षण करणार असतानाच बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्ह्य़ात जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत पाऊस सुरूच होता. आकाशात जमलेले ढग पाहता तो मुक्कामीच राहील, असे एकूण चित्र आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मात्र यात मोठे नुकसान झाले. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची गुरुवारी सकाळी ८ वाजता नोंद मिमीमध्ये, कंसात आजवरचा एकूण पाऊस. हिंगोली १३६ (१२५८.१), वसमत २१.४३ (९७६.६१), कळमनुरी ८०.१७ (१०७२.९४), औंढा नागनाथ २६.२५ (१२७५.८७), सेनगाव २३.६७ (१०८२.६८). १ जून ते ३ ऑक्टोबपर्यंतचा पाऊस ५६६६.११ मिमी. चालू वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी १२८.७४ टक्के असून, गतवर्षी याच तारखेला ती ७३.२१ टक्के होती.

Story img Loader