दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वरुणराजाने करवीरनगरीत हजेरी लावली. दुपारी सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे अवघे शहर चिंब झाले होते. सायंकाळी पावसाने उघडीप दिली तरी आकाशात काळ्या मेघांची दाटी झाली होती.
जून महिना उजाडल्यापासून वळीव पावसाची हजेरी सुरू होती. मात्र गेले दोन दिवस पावसाचे दर्शन झाले नव्हते. कालपासून हवेतील उष्माही वाढला होता. बुधवारी सकाळपासून ऊन-सावलीचा पाठलाग सुरू होता. हा खेळ दुपारी आलेल्या पावसाने थांबविला. सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. यामुळे शहराच्या सर्व भागात पाणी साचले होते.
हॉकी स्टेडियम, व्हीनस कॉर्नर, भूपाल टॉवर, कळंबा या ठिकाणी असलेल्या सखल भागात पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले होते. भूपाल टॉवरजवळ फोटोफ्रेम, लॉटरीचे विक्रेते आहेत. जोरदार पाऊस आणि साचलेले पाणी यामुळे या विक्रेत्यांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला. पावसातच त्यांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली होती. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यांवर तसेच गटारीतून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने भर पावसाळ्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार याची झलकच आजच्या पावसाने दाखवून दिली.
कोकणातून होणारी वाहतूक रत्नागिरी-कोल्हापूर राज्यमार्गाने होत असते. कोल्हापूरपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रजपुतवाडी या गावाच्या हद्दीमध्ये एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला होता. जोरदार पावसामुळे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला समजल्यानंतर त्यांचे पथक तेथे दाखल झाले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतुकीला पूर्ववत सुरुवात झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा