कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कमालीच्या उष्म्यानंतर कराड व पाटण तालुक्यातील सर्वच विभागात जोमदार पाऊस झाला. कराड शहरात सर्वत्र पाणीच पाणी होताना पावसाच्या गारव्याने कराडकरांसह कराड व पाटण तालुक्यातील जनता सुखावली आहे.
पावसाने ठिकठिकाणी पत्रे उडून जाणे, कच्च्या मातीच्या भिंती कोसळणे, गोरगरिबांची पालाची घरे जमीनदोस्त होणे, पिकांचे नुकसान होणे, झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प होणे, विजेचा लपंडाव असे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. मात्र, कराड व पाटण तालुक्यातील महसूल प्रशासनाने कोठेही नुकसानीची माहिती नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दिवसभरातील अंगाची लाही लाही करणाऱ्या तळपत्या उष्म्याने सायंकाळी ढग दाटून येऊन पावसाची शक्यता निर्माण झाली.
मुहूर्तावर मान्सूनचे आगमन व्हावे म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा काल रविवारी दुपारनंतर झालेल्या समाधानकारक पावसाने सुखावला आहे. मान्सून सदृश वातावरणानंतर कोसळलेल्या या मान्सूनपूर्व पावसामुळे मान्सूनच्या
मुहूर्तापूर्वीच पाच दिवस अगोदरच कोयना धरणाची पर्जन्य नोंदवही नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. आज सोमवारपासून कोयना धरण व्यवस्थापनाकडून चालू वर्षांच्या पावसाच्या नोंदी दिल्या जात आहेत. सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा ३२.७० टीएमसी इतका असून, पैकी २७.५७ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. कोयना प्रकल्पातील सर्व वीजजनित्रे क्षमतेने कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काल रविवारी दुपारनंतर पाटण तालुक्यात सरासरी २७.६६ मि. मी. तर कराड तालुक्यात १७.८७ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यात पाटण तालक्यात मरळी विभागात सर्वाधिक ६७ मि. मी. तर तळमावले विभागात सर्वात कमी २ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यातील कोळे विभागात सर्वाधिक ६२. ४० मि. मी. तर इंदोली विभागात ०. ४० इतका नगन्य पाऊस झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात सरासरी ३४.६६ मि. मी. पाऊस झाला आहे. हेळवाक विभागात सर्वाधिक ५९ तर महाबळेश्वर विभागात सर्वात कमी २० तसेच नवजा विभागात २५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा