जिल्ह्य़ाातील लोणार तालुक्यात आभाळ फाटून विक्रमी पाऊस पडल्याने सुमारे पंधराहून अधिक गावातील हजारो हेक्टर खरिप पिके उध्वस्त झाली आहेत. लोणार तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ओला दुष्काळ पडण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. अनेक गावातील मातीच्या घरांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. या पाश्र्वभूमीवर लोणार तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेती व घरांसह मालमत्तांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून त्यांना तातडीची सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुबोध सावजी यांनी केली आहे. दरम्यान, महसूल यंत्रणांनी नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले असून त्याचा अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर केला जाणार आहे.  
लोणार तालुक्यातील विक्रमी पावसामुळे सर्वच्या सर्व म्हणजे आठही लघू पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. लहान-मोठी जलाशयेही तुडूंब झाली आहेत. धरणाच्या वितरिकेमधून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग होत आहे. ढगफुटीसदृश्य विक्रमी पावसाने दहा वर्षांतील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. लोणार तालुक्यातील टिटवी, नांद्रा, गोत्रा, रायगाव, सुलतानपूर, वडगाव या गावांच्या नद्यांना जोरदार पूर आले होते. मंगळवारी रात्रभर या गावांचा मुख्यरस्त्यांशी संपर्क तुटला होता. अनेक पूलही वाहून गेले. शेकडो नागरिकांना ठिकठिकाणी अडकून बसावे लागले. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी सिरून हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके संपूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शासकीय सुत्रानुसार रेकॉर्डब्रेक म्हणजे ४१९ मि.मी. अर्थात १७ इंच पावसाची नोंद झाली. जलसंपदा खात्याच्या अधिकृत सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. पावसामुळे लोणार शहर व विविध गांवातील घरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले. लोणारसह अनेक गावात शेकडो मातीची घरे व ठिकठिकाणी मातीच्या घराच्या भिंती जमीनदोस्त झाल्याची आढळून आले. सरस्वती नदीच्या पुरात पंधरा गुरे वाहून गेली. बऱ्याच गावांतील लोकांना सुरक्षित स्थळांचा आश्रय घ्यावा लागला. प्रचंड पावसामुळे सुमारे दहा गावांतील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तालुक्यातील शिवणी जाट, टिटवी, अंभोरा, गुंधा, तांबोळा, पिंपळनेर, देऊळगाव कुंडपाळ हे आठही लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले असून वितरिकेमधून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग होत आहे.
लोणार तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही शासकीय यंत्रणांनी पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतलेली नाही. शासनाने नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून आपादग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी सुबोध सावजी यांनी केली आहे. लोणार तालुक्यातील आठही लघुसिंचन प्रकल्पात मत्स्य व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. अनेक मत्स्य व्यावसायिकांनी नुकतेच मत्स्य बिजे तलावांमध्ये टाकली होती. मात्र, पूर परिस्थितीमुळे ते वाहून गेले. धरणात मत्स्य बीज टाकणारा दीपक भरत जाधव याचा अचानक आलेल्या पूरामुळे मृत्यू ओढवला. बुधवारी सकाळी बागुलखेड येथील नदीच्या काठावर त्याचा मृतदेह आढळला. बुधवारी दुपारनंतर अतिशय शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहकरचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार निर्भय जैन यांनी मृत दीपकच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा