नगर शहर व परिसराला गुरुवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरात सलग पाचव्या दिवशी पावसाने मुक्काम ठोकला आहे. श्रीगोंदे तालुक्यात बुधवारीही सव्वा इंच पावसाची नोंद झाली. श्रीगोंदे पाठोपाठ कर्जत तालुक्यातही पावसाने सरासरी पार केली. जिल्हय़ात पावसाने आज ८० टक्क्यांचा टप्पा ओलांडला.
मागच्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी जिल्हय़ात पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. नगर शहरात मात्र आज पाचव्या दिवशी पावसाचा जोर आणखी वाढला. शहरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. ११च्या दरम्यान मात्र मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सुमारे तासभर त्याचा जोर टिकून होता. तो ओसरल्यानंतरही बराच वेळ हलक्या सरी सुरूच होत्या. पाऊस उघडल्यानंतर तासाभरानेही रस्त्यांच्या कडेने पाण्याचे ओहळ वाहात होते. नगरकरांनी असा अनुभव बऱ्याच दिवसांनी घेतला. शहराचा सखल भागही या पावसाने जलमय झाला.
आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांतील जिल्हय़ातील पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बाहेरील आकडे बुधवारच्या पावसाचे असून ते मिलिमीटरमध्ये आहेत, कंसातील आकडे टक्केवारीचे आहेत. अकोले-२५ (१२५), संगमनेर-पाऊस नाही (६५), कोपरगाव-१ (७०), श्रीरामपूर-२६ (७२.५३), राहुरी-पाऊस नाही (६४), नेवासे-२ (५९.३८), राहाता-पाऊस नाही (९२), नगर-१७ (६९.६७), शेवगाव- पाऊस नाही (७४), पाथर्डी-पाऊस नाही (६४.२७), पारनेर-८ (७६.३९), कर्जत-५ (१००.५३), श्रीगोंदे-३२ (१२१.६०) आणि जामखेड-३० (७६.२०).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा