रात्रभर पाऊस, अतिवृष्टीचा इशारा
सोमवारी पहाटेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने हाहा:कार उडाला. बेसा ते पिपळा या भागातून अग्निशमन दलाच्या जवानांनी शंभराहून अधिक लोकांना नावेतून सुरक्षित ठिकाणी हलविले. उमरेड मार्गावरील बहादूर येथे १३ वर्षांचा एक लहान मुलगा वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
रविवारी सकाळपासून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली. मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडवून दिली. धो धो बरसणाऱ्या पावसाने रात्री नागरिकांची झोप उडवून धडकी भरली. पावसाचा जोर एवढा होता की ढगफुटी झाल्याची नागरिकांना शंका आली. सकाळपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. बेसा ते पिपळा या दरम्यान अनेक वस्ता सखल भागात आहेत. त्यातच बेसाकडून पिपळाकडे जाणाऱ्या नाल्याला पूर आल्याने नाल्यातील पाणी वस्त्यांमध्ये शिरले. सूर्योदय नगर, पवनसूत नगर, बेलदार नगर या संपूर्ण पट्टय़ात अनेक घरांना पाण्याने वेढले. सकाळी दिवस उजाडल्यानंतर रात्रभर पावसाने केलेला कहर नागरिकांना दिसले. चारही बाजूंला पाणीच पाणी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले. बेसा ते पिपळा नाल्याच्या काठावरील वस्त्यामधील लोक घराच्या गच्चीवर चढले.
नागरिकांनी अग्निशमन दलाला सर्वत्र पाणी साचल्याचे कळविले. अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे, एम. के. गुडधे, सुनील राऊत यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी या परिसरात धाव घेतली. या भागात बोटीतून त्यांनी शेकडो नागरिकांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेले. सुदैवाने सकाळनतर पाऊस थांबला आणि त्यामुळे पाणी ओसरू लागले. दुपापर्यंत अनेक भागातील पाणी ओसरलेले होते. रात्रभर झालेल्या पावसामुळे पांढराबोडी, तेलंखेडी, गिट्टीखदान, वाडी परिसरातील खोलगट भागातील घरे तसेतच झोपडय़ांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. रात्र त्यांना जागून काढावी लागली.
ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल झाले. नरखेड, काटोल आदी अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने घरांमध्ये पाणी शिरले. कळमेश्वरमध्ये रात्रभरात दोन सेंमी पाऊस झाला. सकाळी पाऊस थांबला असला तरी येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.

Story img Loader