पावसाळी नियोजन फसले
लागोपाठ तिसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्राची उपराजधानी अक्षरश: हादरली. पॉश वस्त्यांसह, नदीकाठच्या झोपडपट्टय़ा आणि सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वित्त आणि जीवित हानी झाली आहे. अतिवृष्टीचे दोन अनुभव घेतल्यानंतरही महापालिका आणि आपात्कालीन यंत्रणेचे पूरस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने नियोजन कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुंबलेली गटारे आणि नाल्यांमुळे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये शिरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शहरातील रस्त्यांवरील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने कंबरभर आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ लोकांवर आली. महापौर, महापालिका आयुक्तांसह सर्वच संबंधित अधिकारी बुधवारी रात्रभर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी जागत होते. परंतु, ही स्थिती का उद्भवली यावर आता र्सवकष चर्चा करून उपाय आखण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी बोट बोलवावी लागली यावरून परिस्थिती किती बिकट होती, याचे चित्र समोर आले.
बुधवारी सायंकाळी कळमना आणि पारडी परिसरात वाहून गेलेला १२ वर्षीय अभिषेक मिश्रा आणि ४५ वर्षीय किशोर कोंडेवार या दोघांचे मृतदेह कळमाना नाल्याजवळ सापडले. किशोर कोंडेवार कळमना बाजारात कामाला असून ते घराकडे परत असताना ऑक्ट्राय नाक्याजवळ त्यांची गाडी घसरल्याने खाली पडला आणि नाल्यात वाहून गेले होते. छोटी खदान परिसरातील शेख जावेद शेख बशीर यांच्या घरात पाणी साचल्यामुळे ते पाणी काढत होते विद्युत प्रवाह सुरू असताना त्यांना शॉक लागला आणि त्यातच त्यांचा लागून मृत्यू झाला. जरिपटक्यात वाहून गेलेल्याचा शोध अद्याप सुरू आहे.
बुधवारी रात्री अग्निशामक विभागात शहरातील विविध भागातून फोन खणखणत असताना यंत्रणा मात्र त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकत नव्हती, अशी परिस्थिती होती. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले. आज सकाळी अनेक भागातील पाणी ओसरले. अनेक घरांमधील पाणी काढण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होती.
गटारे तुंबल्याने गटारांमधील घाण रस्त्यांवर आली आहे. शहरातील ‘हायक्लास‘ समजल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरले. शहरातील शेकडो अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याने वाहने रात्रभर पाण्यावर तरंगत होती. या वाहानांच्या दुरुस्तीसाठी आज मेकॅनिककडे अक्षरश: रांगा लागल्या होत्या. पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही स्थिती उद्भवली होती. मोरभवनमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने अनेक लोकांनी बोटीत बसवून बाहेर काढाले लागले. गोळीबार चौक, भालदारपुरा, वैशालीनगरामध्ये घरे पडले असून पिवळी नदी परिसरातील एका मंदिरात ५० पेक्षा अधिक नागरिक अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक विभागाला बरीच कसरत करावी लागली. सिव्हील लाईनमधील रेशनिंग कार्यालय, उच्च न्यायालय पसिसरात पाणी साचले होते. तांडापेठ, बिनाकी, शआंतीनगर , कावरापेठ, नारा घाट, छावनी, नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्रमांक ८ , ९ व १० मध्ये पाणी साचल्यामुळे त्या भागातील अनेक नागरिकांना रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. वस्तीतील अनेकांची व्यवस्था महापालिकांच्या शाळांमध्ये करण्यात आली. रविनगरमधील शासकीय वसाहतीमध्ये मोठे झाड पडल्यामुळे त्या ठिकाणी एक नागरिक जखमी झाला. कळमना भागातील धोपटे ले आऊटमध्ये पाणी शिरल्याने त्या ठिकाणाहून ५० पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मस्कासाथ परिसरात आज सकाळी एक घर कोसळले मात्र त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
शहरातील अनेक अपार्टमेंटमधील बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक लोकांना आज सकाळपर्यंत घराबारे पडता आले नाही. रात्री आठनंतर पाावसाने उघडीप दिल्याने वस्त्यावस्त्यांमधील लोक पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. अनेक ठिकाणी अग्निशमन विभागाच्या गाडय़ा पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे कंबरेपर्यंत पाणी साचलेल्या घरांमध्ये हाहाकार माजला होता. लोक जमेल तसे पाणी बाहेर फेकताना दिसत होते. घरातील सामानाचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे कारण नाल्यांना आलेला पूर आणि तुंबलेली गटारे हेच आहे. कधी नव्हे ती नानगदी यावेळी तुडूंब भरली होती. येत्या २४ तासात आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
तिसऱ्या पावसाने पुरती दाणादाण
पावसाळी नियोजन फसले लागोपाठ तिसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्राची उपराजधानी अक्षरश: हादरली. पॉश वस्त्यांसह, नदीकाठच्या झोपडपट्टय़ा आणि सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वित्त आणि जीवित हानी झाली आहे. अतिवृष्टीचे दोन अनुभव घेतल्यानंतरही महापालिका आणि आपात्कालीन यंत्रणेचे पूरस्थितीला
First published on: 02-08-2013 at 09:11 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in nagpur struct the daily life