उत्तर महाराष्ट्रात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून नंदुरबार व धुळे जिल्ह्य़ांत नद्या-नाल्यांना पूर आला असून धुळे जिल्ह्य़ात २४ तासांत ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुरामुळे नंदुरबार जिल्ह्य़ातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तो सोमवारी हळूहळू पूर्ववत होऊ लागला असून जळगाव जिल्ह्य़ातील रावेर येथे पावसामुळे भिंत पडून एका वृद्धेचा बळी गेला.
जळगावसह जामनेरला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ७६ टक्के जलसाठा झाला आहे. नाशिक शहर व परिसरातही गणेशोत्सवापासून दररोज पाऊस हजेरी लावत असून सोमवार सकाळपासून संततधार सुरू होती. या पावसामुळे विहिरी व तलावांमधील जलसाठय़ात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्य़ातील सात धरणे भरली आहेत.
दोन दिवसांच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्य़ात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. रविवारी दुपापर्यंत जिल्ह्य़ातील १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला होता. गोमई, खडी, सुसरी या नद्यांना पूर आल्याने काठालगतच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने गावांशी तुटलेला संपर्क पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. शहादा-म्हसावद-धडगाव हा रस्ता वाहतुकीसाठी सहा तास बंद होता. तर अक्कलकुवा-मोलगी, तळोदा-प्रतापपूर, तळोदा-मोड, शहादा-डोंगरगाव या रस्त्यांवरील वाहतूकही काही काळ बंद होती. जयनगरजवळ म्हैस नदीत पुराच्या पाण्यात उलटी झालेल्या राज्य परिवहन बसचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
धुळे जिल्ह्य़ानेही यंदा प्रथमच अशा जोरदार पावसाचा अनुभव दोन दिवसांत घेतला. धुळे शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी २४ तासात साक्री २८, शिंदखेडा १९, शिरपूर ४३ मिलिमीटर याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. शिरपूर तालुक्यातील अर्थे गावाजवळील नदीला पूर आल्याने अर्थे बुद्रुक, बलकुदे आणि कुदे या गावांचा संपर्क तुटला. चंपावती नदीला पूर आल्याने चहार्डी, चिंचखेडा व धुपे खुर्दे या गावांनाही फटका बसला. अनेर नदीनेही धोक्याची पातळी ओलांडत घोडगावात शिरकाव केला.
जळगाव जिल्ह्य़ातही शुक्रवार ते रविवार सायंकाळपर्यंत ६७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तापी, गिरणा, वाघूर, पूर्णा, बोरी, रत्नावली, अंजनी, सूर या नद्यांना पूर आले आहेत. हतनूर धरणाचे ३६ दरवाजे शुक्रवारपासूनच उघडण्यात आले आहेत. वाघूर धरणाची निर्मिती झाल्यानंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणावर जलसाठा झाला आहे. रावेर तालुक्यातील निंबोरा येथे मातीचे घर कोसळल्याने जमुनाबाई विठ्ठल महाजन (६४) या वृद्धेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा जखमी झाला.
नाशिक जिल्ह्य़ात पावसाचा जोर नसला तरी संततधार सुरू असल्याने धरणांच्या जलसाठय़ात वाढ होत आहे.
 सद्यस्थितीत गंगापूर ९६.२५ टक्के, कश्यपी ८७, गौतमी ९२.६१, आळंदी १००, दारणा ७१.४९, भावली १००, मुकणे ६७.३१, कादवा ९७.६२, वालदेवी १०० टक्के याप्रमाणे धरणांमधील जलसाठा आहे.
चोवीस तासांत नाशिक १७, इगतपुरी २७, घोटी ३०, त्र्यंबकेश्वर २५, अंबोली ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा