पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळणाऱ्या आटपाडी, जत तालुक्याला हुलकावणी देत मान्सूनपूर्व ‘रोहिणी’च्या पावसाने सांगली-मिरजेसारख्या शहरी भागाला झोडपून काढले. जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावून गारवा निर्माण केला असून जिल्ह्यात काही भागात पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. तर जत, आटपाडी, विटा भागातील शेतकरी मशागतीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
रविवारी सायंकाळी पूर्वेकडून येणाऱ्या बिगरमोसमी पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. दिवसभराच्या उकाडय़ानंतर विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मिरज शहरात ४७.२ मि.मि. इतकी झाली असून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. सांगली शहरात मात्र, २४.७ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात हा सर्वाधिक पाऊस आहे.
दुष्काळी कवठेमहांकाळ तालुक्यात ११.०४ मि.मि. तर जत ७ मि.मि. इतकी पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांत मान्सूनपूर्व पाऊस झालाच नव्हता. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी सायंकाळी तालुक्यातील नागज, ढालगाव, तोरोची, केरेवाडी, कदमवाडी, दुधेभावी, या भागात समाधानकारक पाऊस झाला.
कवठेमहांकाळमध्ये ११.०४ मि.मि. पावसाची नोंद झाली असली तरी, ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कुची,जाखापूर, कुंडलापूर, घाटनांद्रे या परिसरात मात्र पावसाचा पत्ता नव्हता. आटपाडी तालुक्यात ढगाळ हवामान असले तरी, पावसाचा मात्र पत्ता नव्हता. आटपाडी, करगणी, दिघंची या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची दाहीदिशा तंगडेतोड सुरु असली तरी, पावसाची कृपा मात्र अद्याप झालेली नाही. जत तालुक्यात संख, माडग्याळ, मुचंडी या ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कुंभारी, शेगाव, उमदी परिसरात मात्र पावसाने किरकोळ हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सावळज वगळता मांजर्डे, मणेराजुरी, विसापूर या परिसरात पाऊस झाला. कवठेएकंद,कुमठे, वेजेगाव परिसरात हलका पाऊस झाला. मात्र, सावळज,बिरणवाडी,जरंडी,अंजनी या भागात पावसाने हुलकावणी दिली. खानापूर तालुक्यात विटा, पेड, खानापूर या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असताना पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी पूर्व भागातील शेतकरी जोरदार वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विटा, माऊली, चिखलहोळ, येतगाव परिसरात बऱ्यापकी पाऊस झाला. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात, सांगाव, मांगले, चरण, कोकरूड, शिरसी या गावांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने अधून-मधून हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसत आहे. पलुस तालुक्यातील पलूस, भिलवडी, अंकलखोप, कुंडल या भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तालुक्याच्या अन्य भागात पावसाच्या तुरळक सरी आल्या.पावसाची रिपरिप सुरू असताना विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहत होते.
सांगली-मिरज शहरात दैना
सांगली-मिरज परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शहरवासीयांची दैना उडाली. उकाडय़ाने नागरिकांना हैराण केलेले असतानाच सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. मिरज, सांगलीतील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. मंगल टॉकीजसमोरील रस्ता तसेच किल्ला भागातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. सांगलीतील स्टेशन चौक, झुलेलाल चौक, सिव्हील हॉस्पिटल परिसरात पाणी साचले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास सांगली व परिसरात प्रचंड वारे सुरू झाले.त्यानंतर पावसाने हजेरी लावली.शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.भाजी मंडई पाण्याखाली गेल्याने भाजी व फळे विक्रेते,फेरीवाले, किरकोळ व्यावसायिक यांची मोठी तारांबळ उडाली. गुंठेवारी भागासह उपनगरांमध्ये नागरिकांची चांगलीच पंचायत झाली. गुंठेवारी भागातील अनेक घरात पाणी शिरले,रस्ते पाण्यात गायब झाले. पाऊस थांबल्यानंतरही चिखलातून रस्ता शोधत घरी जाताना महिला व मुलांचे हाल झाले.
सांगली शहरातील शासकीय रुग्णालयानजीक असणाऱ्या चौकातील गटारीत जाण्यास मार्गच नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून होते. नेहमीप्रमाणे स्टेशन चौक, स्टेशन रोड, मारूती चौकातील पाणी कमी होण्यास बराच वेळ लागला. मारूती चौक तसेच शहरातील इतर प्रमुख मार्गावर गटारीचे पाणी रस्त्यावरूनच वाहत होत्या. त्यामुळे रस्त्यावरचे पाणी कमी झाल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती.
सांगली, मिरजेला झोडपले; आटपाडी, जतला हुलकावणी
पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळणाऱ्या आटपाडी,जत तालुक्याला हुलकावणी देत मान्सूनपूर्व ‘रोहिणी’च्या पावसाने सांगली-मिरजेसारख्या शहरी भागाला झोडपून काढले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-06-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in sangli and miraj feint to atpadi jat