गेल्या सहा दिवसांपासून संततधार पावसाने जिल्ह्य़ातील जनजीवन अक्षरश विस्कळीत केले असून जिल्ह्य़ावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. या आठवडय़ात वादळी पावसामुळे १७ जणांचे बळी घेतले आहे, तर लहान-मोठी २५ जनावरे वाहून गेली आहेत. पावसाने अंशत बाधित झालेल्या घरांची संख्या ४ हजार ७२८ आणि पूर्णत बाधित झालेल्या घरांची २ हजार ३५ असल्याची माहिती आहे. दरम्यान, उमरखेड तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६९ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. तालुक्यातील ईसापूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने नदीकाठच्या १७ गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्य़ात जवळपास ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नदीकाठच्या १२६ गावांना फटका बसून दहा हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्य़ातील ५२ सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे, तर उर्वरित प्रकल्प ५८ ते ९५ टक्के भरले आहे. जिल्ह्य़ात वार्षकि सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डांगे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी केली आहे.
आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस, उमरखेड या तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असून शेतीचे आणि घरांचे जे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचे तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करावी, ३१ जुलच्या आत ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा या पक्षाने दिला आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाने जी दमदार सुरुवात केली ती अजूनही कायम असून नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन कमालीचे हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे.
यंदाच्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक जबर फटका आर्णी तालुक्याला बसला आहे. आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उध्वस्त झाली असून दोन हजार हेक्टर जमीन खरडून गेल्याने बंजर झाली आहे. पनगंगा नदीकाठच्या साकूर, राणी धानोरा, चिकणी, अंजनखेड, महालुंगी, कवठाबाजार, आसरा, अंतरगाव, अडाण नदीकाठच्या तरोडा, चिखलगांव, ब्राम्हणवाडा, पहूर, बोरगांव इत्यादी ४५ पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, उमरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १ हजार ६९ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. ईसापूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने नदीकाठच्या १७ गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले असून दर मिनिटाला ६० हजार घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या ३० वर्षांत झाला नाही एवढा पाऊस यंदा कोसळला. मालेगावजवळील पनगंगा नदीवरील पुलावरून ३ फूट पाणी वाहत असल्याने नागपूर-तुळजापूर मार्ग बंद झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडा वाहने पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत.
यवतमाळ जिल्ह्य़ात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
गेल्या सहा दिवसांपासून संततधार पावसाने जिल्ह्य़ातील जनजीवन अक्षरश विस्कळीत केले असून जिल्ह्य़ावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. या आठवडय़ात वादळी पावसामुळे १७ जणांचे बळी घेतले आहे,
First published on: 26-07-2013 at 08:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in yavatmal struct the daily routine