प्रारंभी दणक्यात सुरूवात करणारा आणि नंतर रिमझिम स्वरूपात अधुनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकसह नंदुरबारमध्ये पुन्हा दमदार हजेरी लावण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. मागील चोवीस तासात नाशिक जिल्ह्यात झालेला ४६६ तर नंदुरबारमधील ४८५ मिलीमीटर पाऊस हे त्याचेच निदर्शक. नाशिक जिल्ह्यात ईगतपुरी, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यास पावसाने झोडपले असले तरी येवला, देवळा, चांदवड व नांदगाव अशा काही तालुक्यात त्याचे स्वरूप तुरळकच होते. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी व नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या विचार करता यंदा आतापर्यंत नाशिकमध्ये दुप्पट तर नंदुरबारमध्ये तिप्पट पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्येही पावसाने हजेरी लावली असली तरी धुळे मात्र अद्याप म्हणावा तसा त्याच्या नकाशावर आलेला नाही.
उत्तर महाराष्ट्रात कधी नव्हे ते, यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले. परंतु, सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर त्याचे अस्तित्व असून नसल्यासारखेच राहिले. या काळात राहिलेली कसर जुलैमध्ये भरून निघण्याची चिन्हे आहेत. नाशिकमध्ये रिमझिम स्वरूपात चाललेल्या पावसाने बुधवारी सायंकाळपासून नूर बदलला. इगतपुरी व पेठ तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक ८९ मिलीमीटर पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. त्यानंतर पेठ ८५, दिंडोरी ५४, त्र्यंबकेश्वर ५३, सुरगाणा ४६.६, नाशिक ४०, निफाड ४२.४ मिलीमीटर या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. उर्वरित बागलाण १०.२, मालेगाव ६, नांदगाव ४, चांदवड ३, देवळा ३.२, सिन्नर १०.८, येवला ५.४ अशी तुरळक पावसाची नोंद झाली. एकाच दिवसात जिल्ह्यात ४६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४,४३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण २,०३७ मिलीमीटर होते. यांचा विचार केल्यास यंदा दुप्पटीहून अधिक पाऊस झाल्याचे लक्षात येते.
इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. इगतपुरी रेल्वे स्थानकासह घोटी शहरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. दमदार पावसामुळे भात पिकाच्या लागवडीला वेग येणार असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पावसामुळे रस्त्यांची बिकट स्थिती झाली असून घोटी-कावनई रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनधारक व ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नाशिकप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही पावसाचे दमदारपणे पुनरागमन झाले आहे. नंदुरबार तालुक्यात ९१, नवापूर ५१, तळोदा ७६, शहादा ५४, अक्कलकुवा १२८, अक्राणी ८५ असा संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४८५ मिलीमीटर पाऊस झाला. या जिल्ह्यात आतापर्यंत १५५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण केवळ ५९३ मिलीमीटर होते. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास या वर्षी हे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मंगळवारी मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली. या भागात पेरणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रातील केवळ धुळे जिल्ह्यात पावसाचे स्वरूप अजुनही रिमझिमच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा