गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीने संग्रामपूर तालुक्यातील एका महिलेचा बळी गेला असून खामगांवनजीकच्या जळका भडंग येथील एका घराची भिंत कोसळून १८ बकऱ्या ठार झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खामगांव शहर व परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीच्या काळात संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथील पुरात वाहून गेलेल्या सुशिलाबाई रामदेव अरबट (६०) या महिलेचा मृतदेह काल सायंकाळी मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथील नदीच्या काठावर आढळून आला. अतिवृष्टीमुळे खामगांवनजीक जळका तेली येथील एका घराची भिंत कोसळून पुंजाजी विठोबा सुळे यांच्या मालकीच्या अठरा बकऱ्या ठार झाल्या. काल रात्रीपासून खामगांव, बुलढाणा, मेहकरसह इतर तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. खामगांवनजीकच्या सर्व नदीनाल्यांना पूर आला होता. खामगांव शहराच्या मध्यभागी असलेल्या फरशी पुलावरून रात्रभर पुराचे पाणी वाहत होते, तर, नांदुरा मार्गावरील सुटाळा पुलावरूनही पुराचे पाणी वाहत असल्याने खामगांव-नांदुरा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सिंधी कॉलनीतील पुलाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते, तर सतीफैलातील स्विपर कॉलनीमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांना जागून रात्र काढावी लागली. येत्या ४८ तासात जिल्ह्य़ात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील ज्ञानगंगा नदीला पूर आला आहे. ज्ञानगंगा नदीवरील पाझर तलाव व संग्राहक तलावाची पाणीपातळी वाढली आहे. ज्ञानगंगेच्या पुरामुळे गेरू माटरगांव येथील ज्ञानगंगा प्रकल्पाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
पोंभूण्र्यात पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू    
मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ात पूर परिस्थिती कायम असून पोंभूर्णा येथे नाल्याच्या पुरात वसंत कस्तुरे (५५) हा इसम वाहून गेला असता त्याचा मृत्यू झाला. पोंभूर्णा या तालुक्याच्या ठिकाणचे रहिवासी असलेले वसंत कस्तुरे मासेमारीसाठी गावाशेजारच्या नाल्यात गेले होते. मुसळधार पावसाने या नाल्याला पूर आला आणि त्यातच तो वाहून गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा