* बेघर झालेल्यांची संख्या ५ हजारावर
* धरणे भरलेली, विसर्गही सुरूच
* शेतजमीन पाण्याखाली
* ग्रामीण भागातील शाळा ओस पडल्या
संततधार पावसाने जिल्हाभर विविध प्रकारची हानी सुरूच असून वरुणराजाची ही ‘आभाळमाया’ आता शेतकऱ्यांसाठी न सोसवणारी ठरल्याची सार्वत्रिक आपत्ती आहे. दरम्यान, जिल्ह्य़ाच्या विविध भागात पुरामुळे बेघर झालेल्यांची संख्या पाच हजारावर पोहोचली असून आज काही भागात माजी आमदार सागर मेघे यांनी अन्नाची पॅके टस वाटून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
सलग १६ दिवसांपासूनची वृष्टी आता ग्रामीण भागाचा अंत पाहणारी ठरू लागली आहे. १०० टक्के भरलेली बहुतांश धरणे, पाण्याचा विसर्ग सुरू असलेली मोठी धरणे, शेतात साचलेले पाणी, काहीच करू न शकणारा हतबल शेतकरी, ग्रामीण भागातील ओस पडलेल्या शाळा, दूरवर मदत पोहोचविण्यात असमर्थ ठरलेले प्रशासन, ठप्प पडलेले सर्वेक्षण, अशी स्थिती सवार्ंचीच परीक्षा घेणारी ठरत आहे. ही आभाळमाया थांबणार कधी, हाच शहरी व ग्रामीण भागाचा प्रश्न आहे.     
सर्वेक्षण होऊ शकणाऱ्या भागाचा आढावा घेऊन महसूल विभागाने ५० हजार एकरातील पिकाचे नुकसान झाल्याचे मान्य केले. घरांची छते उडून गेलेली ४७०० कुटुंबे असून विविध भागात तलाव फु टण्याच्या भीतीने असंख्य कु टुंबे गाव सोडून अन्यत्र पळ काढू लागले आहे. पुरात अनेक गावे बाधित होत असतांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात प्रशासन असमर्थ ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा पातळीवर प्रथमच संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पाणी सोडण्यापूर्वी गावातील पटवारी, ग्रामसेवक, तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सिंचन अधिकाऱ्यांना ताकीद दिली. पूरस्थितीचा सामना करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग, विद्युत कंपनी व बांधकाम विभाग, अशा सर्व प्रमुख खात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे. पूरग्रस्तांसाठी २४ तास मदत केंद्र सुरू झाले. पूरग्रस्तांसाठी तात्काळ जेवण पुरविण्याची सूचना सर्व तहसीलदारांना करण्यात आली आहे.   
 रेल्वेची वाहतूक पुरामुळेच विस्कळीत झाली. त्याचेच दुरुस्ती कार्य पावसाने मंदावले आहे. मात्र, एक मार्ग सुरू करण्यात यश आले. ग्रामीण भागातील बससेवा कधी नव्हे एवढी आज विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक बसेसचे मार्ग वळविण्यात आल्याने ग्रामीण प्रवाशांची त्रेधातिरपिट उडाली. शाळांमधील उपस्थिती शून्यावर आली आहे. या महिन्यात खतांसाठी कृषी केंद्रांवर दिसून येणारी गर्दी दिसेनाशी आहे. पुरामुळे प्रत्येकच तालुक्यात बळी गेला आहे. पेयजल व्यवस्थाही कोलमडली असून दुरुस्तीचे काम संततधार वृष्टीने थांबवून ठेवले. मोठे प्रकल्प तुडूंब भरल्याने सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू असून विविध धरणातील पंचवीसवर दारांमधून धो-धो पडणारे पाणी भयावह करणारे ठरत आहे. प्रत्येक गाव मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रशासनाची एकप्रकारे कसोटीच लागली आहे.
सर्व आठही तालुक्यात दैनंदिन वृष्टी होत आहे. मात्र, काही भागात भागात तीनशेवर मि.मी. झालेली पर्जन्यनोंद गावालाच पाण्याने वेढणारी ठरली. पावसाची सरासरी ७० मि.मी. अशी विक्रमी झाली आहे. हिंगणघाट तालुक्यात हजारावर मि.मी.ची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ वर्धा-९९५, देवळी-९४८, सेलू-९३४ मि.मी. अशी एकूण पर्जन्यनोंद आहे. दरम्यान, आज माजी आमदार सागर मेघे यांनी खडकी, खापरी, क ोलगाव या गावांची पाहणी केली. अनेक घरातील धान्यसाठा वाहून गेल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी अन्नाची पॅकेटस वाटली, तसेच धान्यवाटपही केले. शासनाकडून मिळणारी मदत तात्काळ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची खात्री त्यांनी पूरग्रस्तांना दिली. आर्वी तालुक्यात स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पण, आज अनेक गावे मदतीपासून वंचित ठरल्याने मदतीसाठी शेकडो हातांची गरज भासू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा