शेकडो पूरग्रस्तांना मदतीची आस,नेते डान्सबारवरील चर्चेतच मश्गुल
रस्त्यावर आलेल्या शेकडो पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज असतांना त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी एकही राजकीय नेता पुढे आलेला नसून पत्रकबाज व गावपुढारी डान्सबारवरील बंदी उठल्याच्या चर्चेतच मश्गुल असल्याचे दिसून आले.
दरम्यान, अशा पाश्र्वभूमीवर आर्वीचे दानशूर रमेशचंद्र राठी यांनी पूरग्रस्तांना दोन लाखाचे धान्य वाटप करून माणूसकीची काही बेटं अद्याप अस्तित्वात असल्याचा प्रत्यय आज दिला. विक्रमी वृष्टीने वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी तालुक्यात हाहा:कार उडाला आहे. अशीच वृष्टी आणखी दोन दिवस राहिल्यास जिल्ह्य़ातील प्रत्येक गावाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती कृषी अधिकारीच व्यक्त करीत आहे.
नुकसानग्रस्त शेती व त्याचे सर्वेक्षण आणि नुकसान भरपाई ही बाब पूढची असली तरी पुरामुळे होत्याचे नव्हते झालेल्यांना तात्काळ मदत मिळणे महत्वाचे झाले आहे. पुरामुळे तीन हजारांवर कुटूंब निराधार झाल्याची आकडेवारी असून कित्येकांना शुक्रवारचा आषाढी उपवास आजपासून घडल्याची आपत्ती आहे. सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरातील रासायनिक खते, बैलजोडय़ा, अन्नधान्य, भांडीकुंडी वाहून गेली आहेत. आर्वीत मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. इतरत्र अशा संस्था किंवा प्रशासनही पुढे आले नसल्याचे गंभीर चित्र आहे. अंतोरा, आष्टी, पेठ, अहमदपूर, किन्हाळा, काकडधरा, अंतोरा, बांबर्डा, नरसिंगपूर, चेलवाडी, झोलवाडी, रामधरा, चिस्तूर, नरसिंगपूर, पेठ, सेलू, बेलोरा, डोंगरगाव, हमदापूर, कोपरा, वडगाव, अशा व  शेकडो अन्य गावातील कुटूंब निराधार झाली आहेत. त्यांच्यापर्यंत आजपर्यंत कुणीही पोहोचलेले नाही. त्यातच पावसाने विश्रांती न घेतल्याने महिला, मुले, वृध्दांच्या दैनेला पारावार राहिलेला नाही.
सातत्याने हानी झालेल्या सेलू तालुक्यावर बुधवारी रात्री तर आभाळच फोटले. एकाच रात्रीत २६५ मि.मी.ची पर्जन्यनोंद आज सकाळी झाली. घराघरात पाणी शिरले असून गावातील कामे ठप्प पडली. वर्धा तालुक्यात १५८ मि.मी. व देवळी ७७ मि.मी. पाऊस पडल्याने ग्रामीण भागासोबतच शहरातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये आज पाणी शिरले आहे. मात्र, मदत पोहोचलेली नाही.
समुद्रपूरला माजी सरपंच सुरेश कटारे यांच्यासह काहींच्या घरात पाणी शिरल्याने उपास घडला. पूरग्रस्त झालेले हे सर्वच भाग गाव पुढाऱ्यांच्या वादाने नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, आता त्यांच्यासह मोठे नेतेही या भागात पोहोचले नसल्याचे पूरग्रस्त सांगतात. आर्वीत आमदार दादाराव केचे यांनी शहरात फ ेरफ टका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. पुरामुळे गावात अडकलेल्या शाळकरी मुलांच्या जेवणाची सोय माजी आमदार रामदास तडस यांनी केली. संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले सागर मेघे शुक्रवारी पूरग्रस्तांना भेटणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. चारूलता टोकस पुढील दोन दिवसात पोहोचणार आहेत. आमदार प्रा.सुरेश देशमुख उद्या, शुक्र वारी निराधार कुटूंबाची भेट घेणार आहेत. पालकमंत्री राजेंद्र मुळक व राज्यमंत्री रणजीत कांबळे अधिवेशनात व्यस्त आहेत. खासदार दत्ता मेघे शनिवारी वध्र्यात पोहोचतील. पण, प्रत्यक्षात दोन दिवसात एकही नेता निराधार कुटूंबांपर्यंत पोहोचलेला नाही. गेल्या चार दशकात प्रथमच एवढी वृष्टी झाल्याचे आज लोकसत्ताने निदर्शनास आणल्यावर अनेकांना अतिवृष्टीचे गांभिर्य उमगले. पत्रकबाज पुढाऱ्यांची कमी नाही. पण, त्यांनीही या प्रश्नावर तोंड उघडले नसून गाव पुढाऱ्यांमध्ये डान्सबार बंदी उठल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader