अतिशय कडक उन्हाळ्यानंतर बुधवारी रात्री माळशिरस तालुक्यात विजांच्या  कडकडाटात रोहिणीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. केवळ अर्धा-पाऊण तासातच सुमारे २ इंच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यातील जनतेला यावर्षी अतिशय कडक उन्हाळ्यास सामोरे जावे लागले. तालुक्याच्या चारही बाजूला यावर्षी पावसाचे आगमन झाले असताना तालुक्यातील जनता मात्र त्याच यातना सोसत होती. बुधवारी दिवसभराचा उकाडा पराकोटीचा होता. तरीही सायंकाळी वातावरण शांत झाल्याने लोकांचा हिरमोड झाला असतानाच रात्री ९ चे सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचे  आगमन झाले. या कालावधीत सुमारे २ इंच पाऊस पडून चारा पिके जमीनदोस्त झाली. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. विजेच्या तारा तुटल्या, मात्र त्या पूर्वीच वीजप्रवाह खंडित करण्यात आला होता.
पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागातील माळशिरस सदाशिवनगर या भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. आणखी एखादा पाऊस झाल्यास खरिपाच्या पेरण्या करता येतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा