जोरदार वळवाच्या पावसाने पाचगणी परिसरात मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडे जमीनदोस्त झाली. विजेचे खांब वाकले. वीजवाहक तारा तुटल्याने परिसरात अंधार पसरला असून झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला.
काल दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाचगणी परिसरात झाला. अचानक आलेल्या पावसाने एकच गोंधळ उडाला. पाचगणी, दांडेघर, गोडवली, भिलार, खिंगर या परिसरात पावसाबरोबर जोरदार वादळी वारे वाहात होते. भाजी मंडईत खरेदीसाठी आलेले शंकर बाजीराव धनावडे (वय ३०) रा. भिलार हे गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नचिकेत हायस्कूल समोरून गोडोवलीकडे जाणाऱ्या ट्रकवर सिलवर ओकचे झाड पडून ट्रकचेही नुकसान झाले. तर ट्रकमधून प्रवास करणारे जखमी झाले. पॉवर हाऊस इमारतीसमोर इंडिका मोटारीवरही झाड पडून त्याचे नुकसान झाले. शाहूनगर येथे एका घराचेही मोठे नुकसान झाले. या पावसाने वीजवाहक खांब वाकल्याने वीज वाहक तारा तुटल्या आहेत. त्यामुळे काही परिसरात अंधार पसरला आहे. दांडेघर गोडोली परिसरात घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. महसूल खात्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू झाले आहे. या पावसाने  जनजीवन विस्कळीत झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain with stormy wind in panchgani area