तालुक्याच्या पश्चिम भागातील कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत संततधार सुरू आहे. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला पाच इंच तर पांजरे येथे चार इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. या पावसामुळे भंडारद-याच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली. हरिश्चंद्रगड परिसरात पडत असणा-या पावसामुळे मुळा नदीही आता जोमाने वाहू लागली आहे. तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला. या पावसामुळे तालुक्यावरील टंचाईचे सावट दूर झाले आहे.
मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला असून, काल (रविवार) सकाळपासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांतील कडय़ाकपारीवरून लहानमोठे धबधबे कोसळू लागले असून ओढेनाले पुन्हा खळाळत वाहू लागले आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यात पावसाने प्रथमच शंभरी ओलांडली. रतनवाडी येथे १३१ मिमी तर पांजरे येथे १०५ मिमी पावसाची नोंद झाली. भंडाद-याला ७८ तर घाटघरला ८७ मिमी पाऊस पडला. २४ तासांत भंडारद-याच्या पाणीसाठय़ात २८२ दलघफू भर पडली. आज सायंकाळी धरणातील पाणीसाठा ९८६ दलघफू झाला होता. आज दिवसभरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. कालच्या तुलनेत त्याचा जोर काहीसा कमी असला तरी काही मुसळधार सरी कोसळल्या.
हरिश्चंद्रगड परिसरातील अंबित, पाचनई, शिसवद, कोहणे, कोथळे परिसरातही जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे मुळा नदी आता जोमाने वाहू लागली आहे. तर पाणलोट क्षेत्रातील लहानमोठय़ा बंधारे, तलावांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी जमा होऊ लागले आहे.
पाणलोट क्षेत्राबाहेरही पावसाने दमदार हजेरी लावली. भंडारद-यापासून थेट कळसपर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तालुक्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- अकोले ७०, निळवंडे ७२, वाकी ६७, कोतूळ ७१, देवठाण ९.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भंडारद-यापासून रंधा धबधब्यापर्यंत ओढे, नाले वाहू लागले आहेत, त्यामुळे निळवंडे धरणातही आता नवीन पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६२९ दलघफू झाला होता.

Story img Loader