जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले. दरम्यान, नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून १२७५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नांदेडकरांना सलग ३ दिवस सूर्यदर्शन घडले नाही. जिल्ह्यात यंदा जुलच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाने जोर धरला. मान्सूनच्या प्रारंभी हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्यंतरी विश्रांती घेतली, पण आता जिल्ह्यातल्या सर्वदूर भागात चांगला पाऊस झाला. नांदेडसह माहूर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसात सर्वाधिक ५६.०९ मिमी पावसाची नोंद झाली. आसना, पनगंगा, कयाधू या नद्यांना सततच्या पावसामुळे पूर आले आहेत. नद्या दुथडी वाहात असल्या, तरी धोक्याच्या पातळीबाहेर नाहीत, असे सांगण्यात आले. संततधार पावसाने नदी-नाले, ओढे तुडुंब भरले आहेत. पाणीटंचाईचे संकटही काही प्रमाणात निवळले आहे.
नांदेड शहरात सुरू असलेल्या पावसाने सखल भागातील घरात पाणी साठले. वार्षकि सरासरीच्या निम्मा पाऊस जुलमध्येच पडल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला दिलासा मिळाला. मात्र, आता अनेक नव्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची पहिल्याच पावसाने अक्षरश: वाट लावली. पावसामुळे मुख्य रस्त्यासह शासकीय-निमशासकीय कार्यालयात अक्षरश: शुकशुकाट आहे. अनेक कार्यालयातील उपस्थिती नगण्य होती. बाजारपेठाही ओस होत्या.
विदर्भाचा संपर्क तुटला
संततधार पावसाने जिल्ह्यालगत असलेल्या विदर्भाचा संपर्क तुटला. जिल्ह्यास जोडणाऱ्या कयाधू व पनगंगा नद्या दुथडी वाहात असल्याने वाहतूक बंद पडली. नांदेडातून विदर्भात जाणाऱ्या वाहनांना आता केवळ औंढा मार्ग शिल्लक आहे. भूजल पातळीत वाढ होण्यासाठी हा पाऊस पूरक आहे. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेल्याची घटना घडली.
दोन गावांचा संपर्क तुटला;पुरामध्ये वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरूच असून सलग ३ दिवस पडलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी आलेल्या पुरामध्ये दोन जण वाहून गेले. यातील एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील देवजना व शेवाळा या दोन गावांचा कयाधू नदीचे पुराचे पाणी गावात आल्यामुळे संपर्क तुटला आहे.
वसमत तालुक्यातील किन्होळा येथील मुंजाजी किशन जाधव यांचा पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. औंढा तालुक्यातील जामरून येथील चंदू अमृता जुमडे नंदगावला जाताना पुराच्या पाण्यात पडले. सुदैवाने त्यांना दगडाचा आधार मिळाला. या वेळी धाव घेत लोकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ात ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची सरासरी ५५.७६ टक्के आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत २२.४० टक्के पावसाची नोंद होती.
गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये, कंसात आजपर्यंत पडलेला पाऊस – हिंगोली ७९.७१(५३२.०२), वसमत ९१.४२ (४८३.७४), कळमनुरी ७२.०३ (४४४.२४), औंढा नागनाथ ९५.७५ (५७१.८७), सेनगाव ४२.१६ (४२९.९२).
परभणीत नदीनाल्यांना पूर; सात गावांचा संपर्क तुटला
वार्ताहर, परभणी
सोमवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस सलग तिसऱ्या दिवशी धो-धो कोसळला. मंगळवारी रिमझिम असलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी मात्र जोर धरला. यंदा प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने जिल्हाभर नदी-नाले खळखळून वाहू लागले. पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्यामुळे ७ गावांचा संपर्क तुटला, तर पालम-ताडकळस दरम्यानची वाहतूकही बंद झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणाऱ्या पावसाने बुधवारी मात्र जोर पकडला. सकाळपर्यंत ३३०.६५ मिमी पावसाची नोंद झाली. पालम तालुक्यातील धोंडी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीचे पाणी आसपासच्या शेतात घुसले. केरवाडीजवळ लेंडी नदीला पूर आल्याने आरखेड, फळा, फरकंडा, पुयनी, आडगाव, सायाळा, शिरपूर या गावांचा संपर्क तुटला. पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील ओढय़ावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने ताडकळस-पालम वाहतूक बंद झाली. तालुक्यातीलच आहेरवाडी गावचा संपर्क तुटला. पाथरी तालुक्यातही जोरदार पावसामुळे गोदावरी पात्र भरून वाहत आहे. तालुक्यात ३२० मिमी पावसाची नोंद झाली. गुंज, उमरा, अंधापुरी, गौंडगाव, बाभळगाव, िलबा या गावचे रस्ते बंद झाले. जागोजागी पूल खचल्याने ही स्थिती निर्माण झाली. जिंतूर तालुक्यातही जनजीवन विस्कळीत झाले. पूर्णा नदीही भरून वाहत असून राहटी बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. सेलू तालुक्यातही नदी-नाल्यांना पूर आला. या पावसामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढू लागल्याने विहिरींची पातळी वाढू लागली आहे. येलदरी, लोअर दुधना या दोन्ही प्रकल्पांच्या साठय़ात मात्र कोणतीही वाढ झाली नाही.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९६ मिमी पावसाची नोंद झाली. परभणी तालुक्यात ३९.५०, पालम २६, पूर्णा ६२, गंगाखेड ४८.५०, सोनपेठ ३४, सेलू ५८.६०, पाथरी ४६, जिंतूर ४४ व मानवत ३७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत परभणी तालुक्यात २९२.८५, पालम २५७.७६, पूर्णा ४३८.४, गंगाखेड ३१८.२५, सोनपेठ ४७२.५, सेलू ३२१.७, पाथरी ३२०, जिंतूर २९७.९६, मानवत २५६.२३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०.६५ मिमी पाऊस झाला.
जालन्यात संततधार; जाफराबाद सर्वाधिक
वार्ताहर, जालना
जालना शहर व परिसरात गेल्या ३ दिवसांपासून अधूनमधून पावसाची संततधार सुरू आहे. या काळात जिल्ह्य़ात सरासरी ४१० मिमी पावसाची नोंद झाली. जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला.
मंगळवापर्यंत सरासरी २८७.२० मिमी पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे, सर्व मिमीमध्ये – जालना ४९.१३ (३५८.१३), बदनापूर ४९.६० (२४६.४०), भोकरदन ३९.५० (२९०), जाफराबाद ७१ (४००.२०), परतूर ४३ (३३०.४०), मंठा २९.७५ (२६७.७५), अंबड ३५.८६ (२५१.८६) व घनसावंगी १७.४२ (१५२.८६). जिल्ह्य़ात आजपर्यंत पडलेल्या पावसाची या काळातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२३.१९ टक्के आहे. जिल्ह्य़ातील वार्षिक अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे प्रमाण ४१.७२ टक्के आहे.
लातुरात पावसाचा मुक्काम
वार्ताहर, लातूर
गेल्या २ दिवसांपासून सातत्याने भीज स्वरूपात पडणाऱ्या पावसामुळे शेतजमिनीची तहान चांगलीच भागते आहे. जलसाठे भरण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मंगळवारी पहाटेपासून जिल्हाभर भीज पावसाला प्रारंभ झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे बळीराजा समाधानी आहे. जिल्हय़ात सगळीकडे पीकपाणी परिस्थिती चांगली आहे. पावसाने विश्रांती न घेतल्यास अंतर्गत मशागतीच्या कामांना वेळ लागेल. शेतात तण वाढेल. सोयाबीनसह पिकांवर रोग पडेल, अशा चिंता शेतकऱ्यांना आहेत.
सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हय़ात सरासरी २२.६० मिमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्हय़ाची सरासरी २८७ मिमीवर पोहोचली. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे – कंसातील आकडे आतापर्यंत पडलेल्या पावसाचे. लातूर १८.२५ (२४६.३५), औसा १२.७१ (२०१.१५), रेणापूर २४.२५ (२८२.२५), उदगीर २५.१४ (३१४.१२), अहमदपूर ३९.५० (३४७.२०), चाकूर २७.२० (२९३), जळकोट ३२.५० (३५२), निलंगा ११.१३ (२७७.५७), देवणी १४.६७ (३०३.३१), शिरूर अनंतपाळ २०.६७ (२५३.०२).
नांदेडसह ४ तालुक्यांत अतिवृष्टी
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले.
First published on: 18-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in nanded