मुद्रांक शुल्क विभागाने या आर्थिक वर्षांत ४१ कोटी ९३ लाखाचा महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे, मुंबईनंतर सर्वाधिक मुद्रांक शुल्क गोळा करणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे.
मालमत्ता व्यवहार या जिव्हाळ्याच्या विषयाच्या नोंदी ठेवणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाने या आर्थिक वर्षांत उद्दिष्टापेक्षा ८ कोटी ९३ लाख जादा महसूल गोळा केला आहे. जिल्ह्य़ातील १५ पैकी १४ तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयात बसविण्यात आलेल्या आधुनिक संगणक प्रणालीमुळे महसुलात वाढ झाल्याचे दिसून येते. जिल्ह्य़ाला ३३ कोटींचे उद्दिष्ट असताना ४१ कोटी ९३ लाख रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना अतिशय जलद व दर्जेदार सेवाही देण्यात आली आहे. चंद्रपूर १७ कोटी १४ लाख, भद्रावती ४ कोटी ५७ लाख, वरोरा ५ कोटी ६२ लाख, चिमूर २ कोटी ६० लाख, नागभीड ९३ लाख, ब्रम्हपुरी २ कोटी ६१ लाख, मूल १ कोटी २६ लाख, सावली ५२ लाख, सिंदेवाही ६२ लाख, बल्लारपूर १ कोटी ७० लाख, गोंडपिपरी ७३ लाख, पोंभूर्णा २८ लाख, राजुरा १ कोटी ९४ लाख, जिवती १५ लाख व कोरपना १ कोटी २६ लाख, असा तालुकानिहाय एकूण ४१ कोटी ९३ लाख महसूल या आर्थिक वर्षांत जमा झालेला आहे.
कालच सह दुय्यम निबंधक कार्यालयात ‘आयसरिता’ या संगणकीय कार्यप्रणालीचा शुभारंभ झाल्यामुळे आता दस्तऐवजाची नोंदणी ऑनलाईन मूळ दस्त स्कॅन करून पक्षकारांना थंबनेल प्रिन्ट, सीडी व मूळ दस्त देण्याची सुविधा असणार आहे. त्यामुळे भविष्यात महसुलात आणखी मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. नोंदणी व मुद्रांक वाढ हा राज्यातील महसूल विभागाचा एक प्रमुख घटक आहे. महाराष्ट्रात सध्या वर्षांकाठी २२ लाखापेक्षा जास्त दस्तऐवज नोंदणी केले जातात. त्याअनुषंगाने दीड, दोन कोटी लोक निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष भेटत असतात. याशिवाय, मुद्रांक खरेदी, अभिनिर्णय, परतावा, अपिल, स्थावर मिळकतीचा सर्च घेणे व मूलांकन करून घेणे, यासाठी ५० लाख लोक अप्रत्यक्षपणे या विभागाच्या संपर्कात येतात. सर्वसामान्य जनतेपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी हा विभाग हायटेक करण्यावर शासनाने भर दिला असून ‘आयसरिता’ हा त्याचाच एक भाग आहे. २००२ पासून राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी ‘सरिता एक’ या संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. दरम्यानच्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभ, जलद व दर्जेदार नोंदणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘आयसरिता’ ही वेबवर आधारित संगणकीय प्रणाली विकसित करून या प्रणालीचा वापर आता सर्वच कार्यालयात सुरू झाला आहे.
या जिल्ह्य़ात १४ तालुक्यात ‘आयसरिता’ कार्यान्वित करण्यात आली आहे. यात नोंदणी पूर्ण झालेल्या दस्ताचे स्कॅनिंग करून सीडी बनविणे व थंबनेल मुद्रणाची एक प्रत, तसेच मूळ दस्त संबंधितांना देण्यात येतो. वेबवर डाटा एन्ट्री केली जात असल्याने नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे. याचा पुढील टप्पा ऑनलाईन सर्च व ई-पेमेंट ही सुविधा उपलब्ध करून देणे असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा