जूनपासून धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या दत्तनगर, सुनीलनगर ते स्वामी समर्थ मठ परिसर जोडणाऱ्या गांधीनगर नाल्यावरील उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पुलावरून हलकी वाहने नेण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. असे असताना या पुलावरून अवजड वाहतूक सुरू असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
या पुलावरून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शाळेच्या बसेची वाहतूक करतात. एका बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी असतात. रिक्षा, हलकी चारचाकी वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे हा पूल तग धरून आहे. स्वामी समर्थ मठ, नांदिवली भागात नवीन वस्ती झाली आहे. हा पूल अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे कोसळला तर या भागातील नागरिकांना मानपाडा भागातून वळसा घेऊन रेल्वे स्थानकाकडे जावे लागेल. त्यामुळे नव्याने वाहतुकीवर ताण पडेल, असे नागरिकांनी सांगितले.
रेती, विटा, डेब्रिजचे ट्रक या पुलावरून नियमित ये-जा करतात. या पुलाच्या बाजूला दोन पोलीस गस्त घालत असतात. तेही याविषयी मूग गिळून गप्प बसतात. फक्त शालेय बस, रिक्षा, हलकी वाहने या पुलावरून सोडण्यात यावीत, अवजड वाहनांना हा पूल बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवासी सुप्रिया कुलकर्णी यांनी केली. नगरसेवक राजन मराठे यांनी या पुलाच्या बाजूला नवीन पर्यायी पूल उभारणीसाठीचा प्रस्ताव महापालिकेतून मंजूर करून घेतला आहे.

Story img Loader