मुस्लीम समाज हा उच्चशिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात आजही मागासला असून या समाजाची आर्थिक व शैक्षणिक प्रगती करायची असेल तर समाजाने भाजपला सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहनवाज हुसैन यांनी नागपुरात केले. ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारानिमित्त मोमिनपुरा येथील नुरानी मैदान, टिपू सुलतान चौकातील जाहीर सभेत बोलत होते.
भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेत बोलताना ते पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री असताना पवित्र हज यात्रेसाठी नागपूर येथून जेद्दाहसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी नितीन गडकरींचे श्रेय होते. काँग्रेस नेहमीच मुस्लिमांना भाजपच्या विरोधात भडकवण्याचे काम करते. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्यात येते. आज संपूर्ण देशात भाजपची लहर असून मुस्लिमांचाही यात सहभाग राहील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. देशात काँग्रेस लूट करत असताना जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी फतवा का काढला नाही. वक्फ बोर्डच्या जमिनीची लूट होत असताना बुखारी काय करत होते, असा सवालही शहनवाज हुसैन यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार विकास कुंभारे, फिरोज खान, शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज गोजे, गुड्डू त्रिवेदी, अब्दुल कादीर, जमाल सिद्दिकी, बबली मेश्राम, लाला कुरेशी आदी उपस्थित होते.