महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार, स्वयंरोजगार विभागातर्फे येत्या एक महिन्यात नागरिकांच्या साहाय्यासाठी ‘विविधा’, ‘मानसी’, ‘स्वयंसिद्धा’ आणि ‘रोजगार नाका’ अशी चार साहाय्य केंद्रे शहरातील चार विधानसभा क्षेत्रांमध्ये सुरू केली जाणार आहेत.‘विविधा’ केंद्रातून शासनाच्या कार्यालयातून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले आणि परवाने यांच्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘मानसी’ केंद्रातून ग्राहक पेठ, तसेच महिला बचत गट, घरगुती उद्योग करणाऱ्या महिला यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘स्वयंसिद्धा’ योजनेतून महिलांना रोजगार विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘रोजगार नाका’ या केंद्रातून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्लंबर, गवंडी, सुतार, इलेक्ट्रिशियन, सुरक्षारक्षक, मोटर वाहनचालक, घरकाम करणाऱ्या व्यक्ती यांच्यासारख्या विविध गोष्टींसाठी मदत केली जाणार आहे. यामुळे नागरिकांच्या कामाबरोबर स्थानिक गरजूंनादेखील रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ही योजना नागरिकांच्या फायद्यासाठी किती खरी ठरते याच्याकडे नागरिकांचे लक्ष आहे.