अध्यापनात विषयाच्या भिंती अडसर ठरव्यात का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या मते अनेक विषय एकमेकांना पूरक असतात. त्यांचे नाते असतेच. विषयांच्या भिंती निर्माण करून अध्ययन-अध्यापन होण्यापेक्षा एकात्म पद्धत अवलंबली गेली पाहिजे, या विचाराने आता विद्यापीठातील भौतिकशास्त्र-संगणकशास्त्र-गणित या विभागांनी एक प्रकल्प तयार केला असून उद्योजकांनीही त्यास साथ दिली आहे. एन्ड्रस-हाऊजर या कंपनीने या प्रकल्पात काम करणाऱ्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग व विद्यापीठातील हा वेगळा प्रयोग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नवे वातावरण निर्माण करून देणारा वेगळा प्रयोग मानला जातो.
डॉ. पांढरीपांडे यांनी विद्यापीठात ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’ ही संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली आहे. बहुतांशी विद्यापीठांत प्रत्येक विषय स्वतंत्र शिकविला जातो. एका विषयाचे दुसऱ्याशी नाते तपासले जात नाही. विद्यार्थी शिकतात, प्रयोग करतात. पण मिळालेल्या माहिती, ज्ञानाचा उपयोग कसा करावा, हे कळत नाही. त्यामुळेच विषयांच्या भिंती बाजूला सारून विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग – शासकीय अभियांत्रिकीमधील यांत्रिकी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या शाखा आणि संगणकशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी एक प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एन्ड्रस-हाऊजर’तर्फे प्रशिक्षणासाठी युरोपात पाठविले जाणार आहे. या प्रकल्पामुळे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना एक नवी प्रयोगशाळा मिळणार आहे.
अशाच प्रकारचा आणखी एक उपक्रम पर्यटन-गणित-सांख्यिकी-संगणकशास्त्र या विभागांत होत आहे. विषयाच्या भिंती बाजूला होणाऱ्या या प्रयोगाचे अध्यापकांमधूनही स्वागत होत आहे. या उपक्रमाची माहिती देताना डॉ. पांढरीपांडे म्हणाले, की शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवेत. काळानुरूप विषयांच्या कक्षा बदलतात. परदेशात तर आता एका विषयाचा अभ्यास करताना दुसरा त्याला जोडलेला असतोच. यापुढे असे स्वतंत्र विषय हाताळून फारसा उपयोग होणार नाही. म्हणूनच विषयांच्या भिंती तोडण्याचे ठरविले. मानसशास्त्र-योग-त्याचा अध्यापनावर होणारा परिणाम असा विषयही संशोधन स्वरूपात हाताळला जाणार आहे. नवीन संकल्पनांना वाव मिळावा, यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद विद्यापीठाने केली आहे.
या उपक्रमाला उद्योजकांकडूनही सहकार्य मिळत आहे. याविषयी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागाचे डॉ. के. व्ही. काळे म्हणाले, की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना थेट आवश्यक ज्ञान मिळणार आहे. ‘एन्ड्रस-हाऊजर’मधील डेटा मॅनेजमेंट, इमेज प्रोसेसिंगमध्ये विद्यार्थी काम करतील. त्यामुळे प्रयोगशाळेतील प्रयोग व त्याचा प्रत्यक्ष वापर याचा सहसंबंध विद्यार्थ्यांना लक्षात येईल. तीन विभागांना जोडून होणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुभवातून शिक्षण मिळेल. अध्यापनात विषयांचे फ्यूजन नव्या दिशा देणारे आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा