रस्ते, पाणी या विकासकामांसह समाजातील सर्व घटकांतील बालकांची सांस्कृतिक भूक भागविणे हेही महापालिकेचे कर्तव्य असून वंचित बालकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी दिली.
महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि बालहक्क संरक्षण समन्वय समिती यांच्या वतीने येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित वंचित बालकांच्या मेळाव्याचे उद्घाटन अ‍ॅड. वाघ यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा हेकरे, मेळाव्याचे संयोजक चंदुलाल शाह, नगरसेविका शोभना शिंदे आदी उपस्थित होते. वंचित बालकांना आपल्यातील कलागुण दाखविण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे काम करते. आधाराश्रम, निरीक्षणगृह या संस्थांचे पदाधिकारी वंचित बालकांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यामुळे निराधार मुलांची प्रगती होते. समाजातील अशा वंचित बालकांसाठी महापालिकेतर्फे निश्चित सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्तविकात मनीषा हेकरे यांनी महिला व बालकांचे जीवनमान, राहणीमान उंचावणे व त्यांचा सर्वागीण विकास घडवून आणणे, या एकाच ध्यासातून विभागाची वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. वंचित बालकांच्या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत व मोनिका आथरे यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी वंचित बालकांतून कोणाला खेळाडू व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार आहोत, असे सांगितले.