शाहुपुरी जिमखाना मैदानाचे ग्राऊंड्समन शशिकांत भोसले यांना सर्व आजी-माजी क्रिकेटपटू व क्रिकेट प्रेमींच्या मदतीतून जमलेली २ लाख रुपयांची मदत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते भोसले व त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. यापैकी १ लाख ५० हजार डिपॉझिट स्वरूपात तर उर्वरित ५० हजार रुपये त्यांच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, आसमाचे उपाध्यक्ष विवेक मंद्रूपकर, घाटगे ग्रुपचे संचालक तेज घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.     
यावेळी गृह राज्यमंत्री पाटील म्हणाले की, कोणाच्याही अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून येण्याची कोल्हापूरची परंपरा आहे. ग्राऊंड्समन भोसले यांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी निधी संकलित करून या परंपरेला साजेसे काम केले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंच्या मदतीसाठी कायमस्वरूपी निधी उभा करावा. वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांनी तसेच विजयी संघांनी या मदत निधीसाठी आपले योगदान द्यावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली.     
शाहुपुरी जिमखाना मैदानाचे माजी ग्राऊंड्समन शशिकांत भोसले यांनी २५ वर्षे शाहुपुरी जिमखाना मैदानावर सेवा दिली. गेली काही वर्षे ते पक्षाघाताने आजारी असल्यामुळे माजी क्रिकेटपटू अतुल गायकवाड, जमील अथणीकर, राजेश केळवकर, जनार्दन यादव, रहिम खान, अभिजीत भोसले व सुधर्म वाझे यांनी सर्वप्रथम फेसबुकच्या माध्यमातून व नंतर एसएमएस आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्याला क्रिकेटपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, कोल्हापुरातील आसमा या संस्थेसह सचिन झंवर, सिंग काँट्रॅक्टर्स, निल पंडित, अभिजीत मगदूम,
सतीश लोंढे यांनीही रोख मदत जाहीर केली. घाटगे ग्रुपचे तेज घाटगे यांनी भोसले यांच्या मुलास नोकरी देऊन या मोहिमेस कळस चढविला. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने २५ हजार रुपयांची मदत देवून पाठबळ दिले. प्रास्ताविक सुधर्म वाझे यांनी केले. स्वागत व आभार जनार्दन यादव तर सूत्रसंचालन जमील अथणीकर यांनी केले.