राज्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या फळबाग उत्पादकांना राज्य शासन आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली.
राज्याच्या विविध भागात पावसाअभावी फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त फळबाग उत्पादकांना मदत मिळण्याबाबतचा प्रश्न आमदार सुभाष देसाई यांनी उपस्थित केला होता. दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, अशीच शासनाची भूमिका आहे.
राज्यात १३ जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. ८० लक्ष हेक्टर क्षेत्राची पाहणी पूर्ण झाली आहे. केंद्र शासनाकडून पैसे मिळाले नाही तरी राज्य शासन निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना मदतीचे वाटप करेल. १९७२ मध्ये संपूर्ण राज्यातच दुष्काळ पडला होता. यंदा तेवढी गंभीर स्थिती नाही. राज्यात १३ जिल्ह्य़ांतील काही तालुके दुष्काळग्रस्त आहेत. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारीच येऊन गेले. नुकसानग्रस्त फळबाग उत्पादकांना मदतीचा पहिला हप्ता देण्याबाबत दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे डॉ. कदम म्हणाले.
दुबार पेरणीबाबतचा अहवाल सदनात मांडावा, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली. दुबार पेरणीसाठी बँका बिनव्याजी कर्ज देणार आहेत काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुबार पेरणीबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही, तो आल्यानंतर बँकांना सूचना देण्यात येतील, असे उत्तर पुनर्वसन मंत्र्यांनी दिले. दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांची जिल्हानिहाय बैठक घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार विजयराज शिंदे यांनी केली. दुष्काळाच्या प्रश्नावर जिल्हानिहाय बैठका घेऊन त्या जिल्ह्य़ांमध्ये दौरा करणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

Story img Loader