लग्न, वाढदिवसाचे औचित्य साधून संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन घडविणाऱ्या मालिका भोंगळ राजकारण्यांकडून आकाराला येत असताना गणेश बेकरीचे उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी दुष्काळपट्टय़ातील एक गाव दत्तक घेऊन जुलअखेर पिण्याचे पाणी व चारा मोफत पुरविण्याचा संकल्प सोडून वाढदिवस साजरा करण्याचा आयाम बदलून टाकला आहे. चकोते यांच्या या उपक्रमामुळे जत तालुक्यातील डफळापूर या दुष्काळझळा झेलत असलेल्या गावावर ऐन दुपारी निष्पर्ण वृक्षावर आशेची पालवी फुटली आहे. या गावाला एक लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दररोज चकोते उद्योग समूहाच्या माध्यमातून होणार आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून सर्वसामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी अनेक कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे आणि अशा दुष्काळाचे प्रचंड चटके सोसणाऱ्यास मदत करणे समाजाचे कर्तव्य आहे. २४ मार्च २०१३ रोजी चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज गणेश बेकरी नांदणीचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना पाणी आणि चारा पुरविण्याचे नियोजन शिरोळ तालुक्यातील चकोते उद्योगसमूहाच्यावतीने करण्यात येणार आहे. अपघात असो वा आपत्कालीन घटना, कार्यक्रम असो वा सामाजिक कार्य, महापूर असो वा दुष्काळ; नेहमीच चकोते ग्रुपचा पुढाकार असतो. या वाढदिनी सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील डफळापूर हे गाव दत्तक घेवून या गावाला जुल अखेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डफळापूर हे गाव तसे ८ हजार लोकवस्तींचे. या गावात सुमारे ३००० जनावरे आहेत. डफळापूरसह जवळपासच्या वाडयावस्तींना पिण्याच्या पाण्याची दररोज एक लाख लिटर पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्यापासून (रविवार) जुल अखेपर्यंत दररोज एक लाख लिटर पाणी पुरविण्याची जबाबदारी चकोते उद्योगसमूहाने घेतली आहे.
अण्णासाहेब चकोते यांनी स्वतच्या ५ एकर क्षेत्रामध्ये हिरवा मका चाऱ्याचे उत्पादन घेऊन, तसेच चारा संकलन करून येथील जनावरांसाठी चारा पाठविण्याचे नियोजनही केले आहे. या वाढदिनी प्रतिवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर, रूग्णांना फळेवाटप आणि वृक्षारोपण असे सामाजिक कार्यक्रम वगळता वाढदिवसानिमित्त डिजिटल पोस्टर्स, जाहिराती, बुके, हारतुरे आणि इतर खर्चाना फाटा देत वाढदिवसासाठी होणारा सर्व खर्च ं दुष्काळग्रस्तांसाठी करण्याचे ठरविले आहे. या निर्णयात संस्थेंचे अध्यक्ष चकोते, अधिकारी वर्ग, कामगार स्टाफ, वितरक, विक्रेते, रॉ मटेरियल सप्लायर्स, सामाजिक मंडळे व हितचिंतक या सर्वाच्या सहकार्याने मानवतेच्या नात्याने दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा चंग बांधला आहे. हितचिंतकांनी डिजिटल पोस्टर्स, इतर जाहिराती, हारतुरे, बुके इत्यादीवर खर्च न करता देणगी किंवा चारा स्वरूपात मदत करावी, असे आवाहन अण्णासाहेब चकोते वाढदिवस समिती यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा