कराडनजीकच्या बनवडी येथील डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मौजे मरडवाक (ता. खटाव) येथील चारा छावणीतील पशुधनासाठी चाराट्रक पाठवण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकवर्गाने दुष्काळग्रस्त छावणीतील जनावरांसाठी चारा ट्रक पाठविण्याचे केलेले हे कार्य समाजाविषयी सहानुभूती व प्रेम व्यक्त करणारे आहे असल्याचे जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व डॉ. आहेर महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. अशोकराव गुजर यांनी सांगितले.
डॉ. गुजर म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेने १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाचे संकट राज्यावर आलेले आहे. तीव्र पाणी व चाराटंचाई यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमानच अडचणीत आले आहे. जत, आटपाडी, विटा तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार आपल्यापरीने या प्रश्नावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, सामाजिक बांधिलकीतून आपलेही काही कर्तव्य आहे. समाजाचे आपणही काही देणे लागतो. या जाणिवेने महाविद्यालयाच्या वतीने चाऱ्याचा ट्रक पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. या वेळी निवृत्त पोलीस अधीक्षक अशोकराव शिंदे, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, प्रा. श्रीकांत पाटील, इंद्रजित गुजर यांची उपस्थिती होती.