इंदिरा गांधी यांना संकटकाळात मदत करून मी फार मोठी चूक केली. अन्यथा तेव्हाच स्वतंत्र विदर्भ राज्य झाले असते, असा गौप्यस्फोट विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी केला.
टिळक पत्रकार भवनात ‘माझे जीवन, माझा संघर्ष’ या विषयावर शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यक्तिगत जीवनात स्वतंत्र विदर्भासाठी चळवळ कशी व केव्हापासून सुरू केली, याचा उलगडा करताना धोटे म्हणाले, सुरुवातीला मी संयुक्त महाराष्ट्रवादी होतो. १९६२ मध्ये मी विधानसभेवर निवडून गेलो. याच कालावधीत विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आंदोलन सुरू केले. हे विद्यापीठ देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते नकार देऊ लागले. त्याचवेळी विदर्भ सर्वच दृष्टीने संपन्न असताना तो मागे का, असा विचार मनात आला. यावेळी कृषी विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये मला अटक करून येरवडा तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडताच मी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चळवळ सुरू केली. या चळवळीला संपूर्ण विदर्भात पाठिंबा मिळू लागला. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या नावावर निवडणुका लढल्या गेल्या. यावेळी विदर्भातील बहुतांश ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या फॉरवर्ड ब्लॉकच्या ताब्यात आल्या. या सर्व संस्थांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित करून तो राज्य व केंद्र सरकारकडे पाठवला. त्यामुळे राज्य व केंद्रातील सरकारही हादरून गेले होते, अशी माहितीही धोटे यांनी दिली.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लागू केल्यानंतर काँग्रेसचे विभाजन झाले. इंदिराजींच्या चारित्र्यावर धूळफेक होऊ लागली. यावेळी इंदिराजी संकटात सापडल्या होत्या. त्यांना मदतीची गरज होती. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे मदतीचा हात पुढे केला. मी त्यांच्याकडे स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. परंतु, पुढे मात्र त्यांनी वेगळा विदर्भ देण्यास नकार दिला. त्यावेळी इंदिराजींना केलेली मदत ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. त्यावेळी त्यांना मदत केली नसती तर विदर्भाचा इतिहास आज वेगळा असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्याला स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मी त्यांच्याकडे ओढलो गेलो. पण, लवकरच भ्रमनिरास झाल्याने दुरावलो. १९९५ साली बाळासाहेबांची रामटेकला सभा झाली. सत्ता आल्यानंतर दोन वर्षांत विदर्भाचा विकास झाला नाही तर आपण स्वत स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत सहभागी होऊ, असे ते म्हणाले होते. परंतु दोन वर्षांतच काय साडेचार वर्षांंतही त्यांना विदर्भाचा विकास करता आला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र विदर्भाचा ठराव भुवनेश्वर येथे पार पडलेल्या सभेत पारित केला होता. परंतु शिवसेनेने युती तोडण्याचा इशारा दिल्याने भाजपने नंतर हा मुद्दाही गुंडाळून ठेवला. अशा रितीने जेव्हा केव्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सर्वानीच सत्तेसाठी या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केले. हिंदी भाषिकांची अनेक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषेची दोन राज्ये का होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. एक दिवस स्वतंत्र विदर्भ राज्य होईलच, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. विदर्भाची चळवळ ही जनगंगा आहे. यात येणाऱ्या सर्व विचारांच्या नागरिकांचे स्वागत आहे. स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासाठी नक्षलवाद्यांचा पाठिंबा घेऊ, या त्यांच्या वक्तव्याचे स्मरण करून दिल्यानंतरच्या उत्तरात ते म्हणाले, नक्षलवादी ही सुद्धा माणसेच आहे. त्यांनी लोकशाहीतील गुंडशाहीच्या विरोधात हाती बंदुका घेतल्या आहेत. ते सुद्धा या चळवळीत आले तर बिघडते कुठे. हा मुद्दा अनेकांना समजला नसल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा