अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासंदर्भात विदर्भात जे नियम लावले गेले त्यानुसारच संपूर्ण खान्देशातही पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असून महसूल विभागाने केलेल्या पाहणीच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याची    माहिती   फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
तालुक्यातील टिश्यु कल्चर केळी रोपांना अनुदान द्यावे, ज्वारी व मका खरेदीत व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी, शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, तालुक्यात १९० टक्के पाऊस झाला असल्यामुळे उडीद, मूंग, ज्वारी बाजरी, सोयाबीन या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले असून द्राक्ष, केळी, मका पिकांनाही धोका निर्माण झाल्याने विदर्भाच्या धर्तीवर खान्देशातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागण्यांचे निवेदन शशिकांत देवरे, जवरीलाल जैन, डोंगर पाटील, माणिलाल पाटील आदिंनी डॉ. गावित यांना दिले.
यावेळी बोलताना डॉ. गावित यांनी गेल्या वर्षी केळी पिकाच्या विम्यासाठी सरकार व शेतकरी यांच्या संयुक्तपणे १२ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती दिली. त्यातून ४२ कोटींची विमा भरपाई दिली गेली आहे. मागील आठ दिवसात ज्यांनी विम्याचा पैसा भरला त्या शेतकऱ्यांना   जादा पैसा मिळणार आहे.
महाराष्ट्राने सर्वाधिक फळ विमा काढल्यामुळे केळी उत्पादकांना भरपाई मिळाली. केळी, आंबा व संत्रा उत्पादकांना विम्याचा फायदा झाला. गारपीटग्रस्त पिकांचा विमा काढला जात नसल्याने   केंद्रीय  कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे आपण गारपीटग्रस्तांनाही विमा संरक्षण मिळावे अशी मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader