उत्तराखंडामध्ये मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशा मदत न मिळालेल्या गावांचे सर्वेक्षण करून तेथे प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे एक मदक पथक तेथे जाणार आहे.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र वराडकर व नरेंद्र केणी हे त्या ठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेऊन मदत करणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाईल. गौरीकुंड आणि परिसरातील रामपूर, रेलगाव, धारगाव, तरसाळी, खोलबिडासू आदी गावांना भेट देऊन तेथे ही मदत दिली जाणार आहे.
उत्तराखंड येथे सध्या आर्थिक मदतीपेक्षा दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आवश्यक बाब बनली असून त्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. दानशूर नागरिक आणि संस्था या कामी मदत करू शकतात. अधिक माहितीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सावरकर स्मारकात ०२२-२४४६५८७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्मारकाने केले आहे.

Story img Loader