पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे अनेकदा विद्यार्थी तणावग्रस्त होतात. अशा समस्याग्रस्त विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर विभागातील समुपदेशक शिक्षकांनी पुढाकार घेऊन हेल्पलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची खूप गरज असते. त्यांना करिअर निवडीपासून ते पालकांकडून होणाऱ्या मार्गदर्शनापर्यंत अनेक समस्या भेडसावत असतात. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षक त्यांच्या स्तरावर विविध प्रयत्न करत असतात. पण एकटय़ाने केलेले प्रयत्न त्या शाळेपुरतेच मर्यादित राहतात. या प्रयत्नांना सामूहिक रूप देण्याच्या उद्देशाने ही हेल्पलाइनची संकल्पना अंमलात आली आहे, असे या हेल्पलाइनचे समन्वयक व स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे शिक्षक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
या विभागात विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणती वाट निवडायची याबाबत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कला, वाणिज्य विज्ञान याचबरोबर तंत्र शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच व्यवसाय मार्गदर्शन मिळावे यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या वतीने उत्तर विभागातील शिक्षकांना पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून उत्तर विभागातील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच मार्गदर्शन करणार असल्याचे शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा