नववर्षांच्या स्वागतासाठी मोठय़ाल्या पाटर्य़ाचे बेत आखले जात असताना चिकन, मटन, मासळीवर ताव मारत ३१ डिसेंबरची रात्र साजरी करण्याचे बेत आखणाऱ्यांच्या पंगतीत यंदा गतवर्षीपेक्षा महागडे मेनू तयार असणार आहे. ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर कोंबडी भलतीच महागली असून गेल्या आठवडाभरात कोंबडीच्या दरात किलोमागे सुमारे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मटणाचे दरही वधारले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या मासळी बाजारात तर ताज्या, तडफदार मावऱ्याला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. नवी मुंबईच्या प्रसिद्ध अशा दिवाळे बाजारात उत्तम प्रतीची पापलेट, सुरमई एक हजार रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जाऊ लागली असून ठाण्याच्या लहानग्या बाजारांमध्येही कोलंबीचा वाटा शंभरीच्या खाली नाही.
बाजारपेठेत कोंबडीची आवक घटल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. कोंबडी तसेच मटणाच्या वाढत्या दरामुळे न्यू इयर पाटर्य़ाकरिता हॉटेलमधील मांसाहारी पदार्थाच्या दरात वाढ होण्याची शक्यता काही हॉटेल चालकांनी बोलून दाखवली. दरवर्षी सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. या पाटर्य़ामध्ये मद्याबरोबरच मांसाहारी पदार्थाचे मोठय़ाप्रमाणात सेवन करण्यात येते. त्यामुळेच न्यू इयर पाटर्य़ाच्या पाश्र्वभूमीवर कोंबडी, मटण आणि मासळीची मागणी वाढते, असा अनुभव आहे. यंदाही पाटर्य़ाकरिता कोंबडी, मटण आणि मासळीची मोठी मागणी असून त्यामुळे मांसाहार महागला आहे. यंदा बाजारपेठेत आवक घटल्याने कोंबडय़ांच्या दराने भलताच उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोंबडय़ांच्या पूर्वीच्या आणि आताच्या दरात सुमारे ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
न्यू इयर पाटर्य़ाच्या पाश्र्वभूमीवर कोंबडी अचानकपणे महागल्यामुळे हॉटेल, बारमधील मांसाहारी पदार्थाचे दर वाढण्याचे संकेत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संदर्भात, ठाणे हॉटेल ओनर्स असोशिएशनचे कार्याध्यक्ष विजय रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, दरवर्षी न्यू इयर पाटर्य़ाकरिता पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात येते.
पण, यंदा रात्री दीडपर्यंतच पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे न्यू इयर पाटर्य़ाचे आयोजन कशाप्रकारे करायचे हा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे कोंबडी, मटण, मच्छीचे दर वाढले असले तरी, मेनू कार्डमधील मांसाहार पदार्थाचे दर वाढविण्यासंबंधीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
कोंबडीचे किलो मागे दर
बॉयलर चिकण
पूर्वी – १२०, आता – १८०
बॉयलर जिवंत कोंबडी
पूर्वी – १३०, आता – १३०
गावठी कोंबडी
पूर्वी – १६० ते १८०, आता – २५० ते ३००
मटणाचे किलो मागे दर
पूर्वी – ३६०, आता झ्र् ४२०