येथील आधाराश्रमात वास्तव्यास असलेला दोन वर्षांचा ‘समर्थ’ त्याच्या आईच्या कुशीत विसावला आणि साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. मंगळवारी सकाळी आधाराश्रमाच्या आवारात भावपूर्ण वातावरणात समर्थचा दत्तक विधान सोहळा पार पडला. परदेशी कुटुंबियाकडे आधाराश्रमातील मुलगा दत्तक जाण्याची ही दुसरी घटना आहे. लवकरच आधाराश्रमातील आणखी एक चिमुकली इटलीत मुक्काम हलविणार असल्याची माहिती समन्वयक शैला कुलकर्णी यांनी दिली.
साधारणत: सहा महिन्यांपूर्वी भारत सरकारच्या अनाथ, शारीरिकदृष्टय़ा अधू असलेल्या बालकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या के अरिंग (चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स इन्फर्मेशन अ‍ॅण्ड गायडन्स सिस्टिम अर्थात कारा) याद्वारे आधाराश्रमातील समर्थची माहिती नेटच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली होती. समर्थला जन्मत: एक किडनी असल्याने त्याची शारीरिक वाढ काहीशी खुंटली आहे. त्याच्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा दशपुत्रे यांच्याकडून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या कालावधीत संस्थेने ‘कारा’ आणि ‘केअरिंग’च्या माध्यमातून समर्थची माहिती जगभरात पोहचविली. दुसरीकडे समर्थच्या शारीरिक व्यंगाकडे बोट दाखवत भारतीयांनी त्याला दत्तक घेणे टाळले. सुदैवाने स्पेनमधील मानसोपचार तज्ज्ञ झाएरा इस्थर मोरेल्स डोमिंग्ज यांनी मुंबई येथील बालआशा ट्रस्टशी संपर्क साधत आधाराश्रमातील समर्थला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. माहितीची खातरजमा झाल्यावर आधाराश्रमाशी सहा महिन्यापूर्वी झाएरा यांनी संपर्क साधला. त्यानंतर समर्थच्या दत्तक विधान प्रक्रियेने वेग घेतला.
झाएरा नाशिक येथे कोलकत्ता येथील दुभाषक मोती यांच्या समवेत आल्या. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर समर्थला भेटण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आपल्या सवंगडय़ा सोबत खेळणारा समर्थ सुरूवातीला झाएरा यांच्यासोबत जाण्यास नाखुश होता. त्याला खेळणी, खाऊ, बाहेरचा फेरफटका अशी सारी बेगमी केल्यानंतर झाएरा आणि त्याची चांगली गट्टी जमली. मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, निशा पाटील, प्रभाकर केळकर यांच्यासह आश्रमातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत समर्थचा दत्तक विधान सोहळा पार पडला. यावेळी त्याला सांभाळणाऱ्या लाडक्या मावशीसह साऱ्यांचे डोळे पाणावले.