गेल्या काही महिन्यांत जिल्६य़ात घडलेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर राज्य गुप्तचर विभागाने सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळय़ा व्यापाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन ‘दक्ष’ राहण्याच्या सूचना केल्या.
आंध्र-कर्नाटक सीमेवरील नांदेडची नोंद राज्याच्या गृह विभागात ‘अतिसंवेदनशील’ अशी आहे. पूर्वी नक्षलवाद्यांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नांदेडमधील काही तरुणांचा दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेडच्या तरुणांचा सहभाग स्पष्ट झाला होता. नवी दिल्ली पोलिसांनी याच प्रकरणात नांदेडातील दोघांना अटक केली. तत्पूर्वी दहशतवादविरोधी पथकाने देशविघातक कारवायांत सहभागी झालेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या.
मराठवाडय़ात बीडनंतर नांदेड अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दहशतवादी कारवायांत तरुणांचा सहभाग लक्षात आल्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागाने नांदेड पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी वेगवेगळय़ा उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले यांनी शहरातील भंगार विक्रेते, प्लॉट-सदनिका विकणारे, चित्रपटगृहांचे मालक, खासगी ट्रॅव्हल्सचे मालक यांच्यासह मॉल, मंदिर व गुरुद्वाराचे संबंधित पदाधिकारी यांची बैठक घेतली. क्षुल्लक दुर्लक्षामुळे मोठी अनुचित घटना घडू शकते, याकडे लक्ष वेधत पोलिसांनी या व्यापाऱ्यांना ‘दक्ष’ राहण्याच्या सूचना केल्या. संशयास्पद तसेच अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार टाळा, असे सांगताना पोलिसांनी व्यापाऱ्यांना टिप्स दिल्या.
सायंकाळी शहरातील इंटरनेट चालकांनी बैठक घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आवश्यक त्या सूचना केल्या. नांदेड शहर संवेदनशील बनले आहे. या पाश्र्वभूमीवर व्यापाऱ्यांसह सर्वच सुजाण नागरिकांनी सतर्कता बाळगावी, शिवाय संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक श्यामकांत तारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Story img Loader