ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दाखल असून या संबंधी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या सभेत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्या कारभाराविषयी ताशेरे ओढले. तसेच डेंग्यूच्या रुग्णांबाबत माहिती देऊ नये, अन्यथा रुग्णालयांवर कारवाई करू, असे प्रकारही महापालिका आरोग्य विभागाकडून सुरूअसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. केंद्रे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांचा आरोग्य विभागही चांगलाच अडचणीत आला आहे.
राज्यात सर्वत्र डेंग्यूचे लागण झालेले रुग्ण आढळत असून ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचे किती रुग्ण सापडले, त्याविषयी आकडेवारीसहित माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप सदस्य संजय वाघुले यांनी स्थायी समितीच्या सभेत केली.  त्यानुसार, डॉ. आर. टी. केंद्रे यांनी शहरातील डेंग्यूच्या रुग्णांबाबत आकडेवारीसहित माहिती दिली. मात्र, त्यामध्ये दगावलेल्या रुग्णांचा आकडा तसेच त्यांच्या नावाची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच यासंदर्भात त्यांच्याकडे माहितीही उपलब्ध नव्हती.   त्यामुळे सर्वच सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत डॉ. केंद्रे यांना चांगलेच धारेवर धरले. वर्तकनगर, कळवा तसेच मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून डेंग्यूचे रुग्ण आढळणाऱ्या भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचेही डॉ. केंद्रे यांनी सांगितले.
तसेच डेंग्यूची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यासंदर्भात सुमारे ८८ हजार भितीपत्रके शहरात लावण्यात आली असून टायर दुकाने, बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोग्य विभागाकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप सर्वच सदस्यांनी केला. त्यामुळे केंद्रे यांनी दिलेल्या माहितीबाबत सर्वच सदस्य असमाधानी असल्याचे दिसून आले.
सर्वसाधारणपणे नगरसेवक राहतात त्याच परिसरामध्ये केवळ धूर तसेच औषध फवारणी करण्यात येते, उर्वरीत भागात  फवारणी करण्यात येत नाही. तसेच फवारणी करणारे कर्मचारी दारूच्या नशेत असतात, असा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे शहरामध्ये धूर व औषध फवारणी करण्यात आल्याचा दावा करणारा आरोग्य विभाग चांगलाच अडचणीत आला आहे.