राज्य शासनाने उच्च दर्जा सुरक्षा नोंदणी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन) नंबर प्लेटचा पुरवठा करण्यास परवानगी देऊ केलेली नसतानाही अशा स्वरूपाच्या नंबर प्लेट असलेली वाहने सरार्सपणे राज्यभर फिरत असल्याचे चित्र आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली असून त्यामध्ये अशा स्वरूपाच्या नंबर प्लेटचा वापर करू नये, अशा सूचना वाहनचालकांना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच या वाहनचालकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा स्वरूपाच्या नंबर प्लेट तयार करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध सुरू केला असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
उच्च दर्जाची सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसविण्याची परवानगी कोणत्या वाहनांना द्यायची, याचे सर्व अधिकार राज्य शासनाचे असतात. पण, राज्य शासनाने अशा प्रकारची परवानगी देऊ केलेली नाही. असे असतानाही विक्रेते अशा स्वरूपाच्या नंबर प्लेट अवघ्या पाचशे ते सातशे रुपयांत तयार करून देतात. त्यामुळे राज्यातील बहुतेक वाहनचालकांनी अशा नंबर प्लेट वाहनांना बसविल्या आहेत. विशेष म्हणजे, या नंबर प्लेटविषयी वाहनचालकांनाही फारशी माहिती नाही. त्यामुळेच कोणतेही अधिकार नसतानाही विक्रेते वाहनचालक अशा नंबर प्लेट तयार करून वाहनचालकांची फसवणूक करीत आहेत. याच पाश्र्वभूमीवर विक्रेत्यांचा शोध घेण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये अशी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांना नोटीस बजावण्यात येत असून त्यामध्ये अशी नंबर प्लेट वाहनास बसवू नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. या कारवाईत आतापर्यंत दहा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
विक्रेत्यांचा शोध..
उच्च दर्जा सुरक्षा नंबर प्लेट तयार करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्यामध्ये अशा नंबर प्लेट बसविलेल्या वाहनचालकांना नोटीस देण्यात येत आहे. अशी नंबर प्लेट वाहनांवर लावू नये, अशी सूचना नोटीसमधून देण्यात येत आहे. तसेच या वाहनचालकांकडून नंबर प्लेट तयार करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती घेण्यात येत असून त्यामध्ये शहरातील काही भागांत अशा नंबर प्लेट तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, या विक्रेत्यांचा शोध सुरू असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी ‘वृत्तान्त’ ला दिली.
अशी असते नंबर प्लेट
उच्च दर्जा सुरक्षा नंबर प्लेट म्हणजे वाहनाच्या नंबर प्लेटवर डाव्या बाजूस ‘आय एन डी’ असे निळ्या अक्षरात लिहिलेले असते. त्याच्या बाजूला एक होलोग्रामही असतो. सध्या विक्रेते अशा स्वरूपाच्या नंबर प्लेट तयार करून त्याची अवघ्या पाचशे ते सातशे रुपयांमध्ये विक्री करत आहेत. त्यामुळेच राज्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये अशा नंबर प्लेटची वाहने दिसू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा