* मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सर्वेक्षणाने केले शिक्कामोर्तब
* ठाणेकर प्रवाशांच्या ससेहोलपटीची अप्रत्यक्ष कबुलीच
गेल्या काही वर्षांत विशेषत: नवी मुंबईसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या कैकपट वाढली असून तुलनेने उपलब्ध सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत, या वस्तुस्थितीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाने शिक्कामोर्तब केले आहे. उपनगरी रेल्वे सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मध्य, पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील अनुक्रमे १४, १३ आणि ११ रेल्वे स्थानकांतील प्रवासी गर्दीचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाने परंपरागत समजुती मोडीत काढून उपनगरी रेल्वे प्रवासाचे नवे वास्तव नेमकेपणे मांडले आहे. विशेष म्हणजे सुविधांबाबत नेहमीच उपेक्षा सहन कराव्या लागणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे हाल या सर्वेक्षणाने चव्हाटय़ावर आणले आहेत. कारण दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत ठाणे स्थानकाने आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच चर्चगेट या स्थानकांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. सर्वेक्षणानुसार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसची दररोजची सरासरी प्रवासी संख्या ६ लाख ३६ हजार असून ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या त्यापेक्षा तब्बल १८ हजारांनी जास्त म्हणजे ६ लाख ५४ हजार इतकी आहे. चर्चगेट स्थानकातील प्रवासी संख्या खूपच कमी म्हणजे ५ लाख पाच हजार इतकी नोंदली गेली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटऐवजी आता अंधेरी सर्वाधिक प्रवासी संख्या असणारे स्थानक ठरले असून येथून प्रवास करणाऱ्यांची संख्या ६ लाख चार हजार इतकी आहे. दादर म्हणजे गर्दी हे समीकरणही आता बदलले असून गर्दीचा रेटा कुर्ला स्थानकाकडे सरकला आहे. कारण नव्या आकडेवारीनुसार दादर स्थानकातून दररोज २ लाख ९० हजार तर कुर्ला स्थानकातून दररोज ३ लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतात.
मुंबईपेक्षा परिघाचाच अधिक विस्तार
गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती कैकपट वाढल्याने मुंबईतले वास्तव्य आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातले राहिलेले नाही. परिणामी, मोठय़ा प्रमाणात ठाणे जिल्ह्य़ातील मध्य रेल्वेवरील ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, तर पश्चिम रेल्वेवरील वसई, विरार, नालासोपारा या उपनगरांचा म्हणजेच मुंबईचा परीघ विस्तारत आहे. ठाणेमार्गे नवी मुंबईकडे उपनगरी सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. तसेच अंधेरी-गोरेगाव-जोगेश्वरी या पश्चिम उपनगरात जाणारे प्रवासी सकाळी अपमार्गावरील जलद गाडीने ठाण्यापर्यंत येऊन तेथून धीम्या गाडीने कांजूरमार्ग, विक्रोळीला जाऊन तेथून बसने प्रवास करतात. परतीच्या प्रवासातही ते दादरला जाण्यापेक्षा हाच मार्ग पत्करतात. बोरिवलीला जाणारे प्रवासीही दादरला वळसा घालून जाण्यापेक्षा ठाण्यात उतरून तिथून बसने प्रवास करतात. वसई-दिवा रेल्वेची प्रवासी संख्याही वाढली आहे. परिमाणी, दादरची गर्दी कमी होऊन ठाणे स्थानकातील वर्दळ वाढली आहे. केवळ ठाणेच नव्हे तर या मार्गावरील डोंबिवली (२ लाख ८३ हजार), कल्याण (३ लाख ६० हजार) येथील प्रवासी संख्याही गेली काही वर्षे झपाटय़ाने वाढत आहे.
‘शटल’ अगदीच तोकडी
ठाणे स्थानकातील वाढत्या प्रवाशांच्या सुलभ वाहतुकीसाठी शटल वाहतूक सेवा हाच एकमेव उपाय असला तरी सध्या गर्दीच्या तुलनेत ही सुविधा अगदीच तोकडी आहे. कारण ठाणे-कर्जत/कसारा या मार्गावर आता सदैव अप तसेच डाऊन दोन्ही मार्गावर प्रवाशांची गर्दी असते. कर्जत, भिवपुरी रोड, वांगणी तसेच आसनगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अंबरनाथ औद्योगिक विभाग दिवसेंदिवस विस्तारत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरातून येथे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी पीकअवरमध्ये ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर किमान अध्र्या तासाने उपनगरी सेवा असणे गरजेचे आहे.