गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि माहीम यात्रेदरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचा आणि एकाच वेळी अत्याधुनिक उपकरणांद्वारे संगीत वाजवले जात असल्यामुळे ते होत असल्याचा अहवाल ‘आवाज’ फाउंडेशनतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. सादर करण्यात आलेली माहिती खरी असल्यास परिस्थिती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट करत राज्य सरकारला त्याबाबत आपले उत्तर दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
उत्सवादरम्यान हादरवणाऱ्या डीजे-साउंड वॉलसारख्या अत्याधुनिक यंत्रणांवर बंदी घालण्यात आल्यास ध्वनिप्रदूषणाचा प्रश्नच निकाली निघेल, असे याचिकाकर्त्यांनी सुचविल्यानंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली होती. तसेच अशा वाद्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश देताना त्यानुसार अंतरिम आदेश देण्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे न्यायालयाने निर्देशातून उत्सवी मंडपांनंतर ध्वनिक्षेपकांवर बंदी घातली जाण्याचे संकेत दिले होते.
उत्सव काळातील मंडपे आणि ध्वनिप्रदूषणाबाबत डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा वर्षांनुवर्षे मांडणाऱ्या ‘आवाज’ फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुल अली यांनी न्यायालयाच्या आदेशाच्या धर्तीवर उत्सव काळात ध्वनिप्रदूषणाची पातळी काय असते आणि ध्वनिप्रदूषण करणारी अत्याधुनिक उपकरणे नेमकी कोणती यांचा अहवाल या वेळी न्यायालयात सादर केला. या अहवालात २००३ सालपासून उत्सवकाळातील ध्वनिप्रदूषणाबाबतचा तपशील नमूद करण्यात आला आहे. त्यातही गेल्या तीन वर्षांच्या माहितीवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार सर्वाधिक ध्वनिप्रदूषण हे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि माहीम जत्रेच्या वेळी एकाच वेळी अनेक ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यामुळे होते. यामुळे २०१३ मध्ये आवाजाची पातळी १२१.८ डेसिबल होती, असे अहवालात म्हटले आहे. गणेशोत्सवादरम्यान वाजविण्यात येणाऱ्या ढोल-ताशांमुळेही मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असून २०१२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान ताशांमुळे ध्वनीची पातळी १२१.४ डेसिबल एवढय़ापर्यंत पोहोचल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर २०१३ मधील गणेशोत्सवादरम्यान ड्रम वाजविल्यामुळे ध्वनीची पातळी ११३.७ डेसिबलपर्यंत, बँजोमुळे ११९.९ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय मिरवणुकीत वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असून २०१४ मध्ये ही पातळी १३२.४ डेसिबल, तर २०१४ मध्ये १२५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचेही अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही सगळी अत्याधुनिक उपकरणे मिरवणुकीदरम्यान एकाच वेळी वाजविण्यात येतात आणि या मिरवणुकी निवासी तसेच शांतता क्षेत्रातून नेल्या जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.