आई राधा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे! अशा जयघोषात नेहमीप्रमाणे जोगवा सुरू झाला आणि सभागृहाने नेहमीप्रमाणे ठेका धरला पण क्षणभरच ‘जोगवा वाढा किंवा वाढू नका, निंदा गण जोगत्याची करू नका, आई-बापाने वाळीत टाकले, बहीण-भावाचे नाते हो तुटले’ या ओळी कानावर पडताच अवघ्या सभागृहाच्या काळजाचा ठोकाच चुकला. संतोष महाळसे याने कामिनी आणि विष्णू यांच्या साथीने सादर केलेल्या या जोगव्याने नटून-थटून आलेल्या आणि चेहऱ्यावर हसू वागवणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवनातील काळरात्रीचे गडद रूप रेखाटले आणि खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही अंतर्मुख झाले.
गुरुवारचा दिवस तृतीयपंथीय आणि जोगत्यांसाठी ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारने त्यांच्यासाठी केवळ मेळावाच भरवला नाही तर त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या जगण्याच्या अधिकारासाठीच्या आंदोलनात पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले. सरकार आपला आवाज ऐकणार म्हणून मुंबई व आसपासच्या भागातूनच नव्हे तर नंदुरबार, कोल्हापूरसारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यांतून तृतीयपंथी-जोगते आले होते. आज मुख्यमंत्री आपल्याशी बोलणार, आपल्या कार्यक्रमाला येणार हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पंधरा-वीस जणांचे समूह एकानंतर एक प्रतिष्ठानमध्ये धडकत होते. पण कुठेही काही गडबड होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात होती. हे सारे घोळके, रांगेत व अत्यंत शिस्तीने सभागृहात प्रवेश करत होते. लक्ष्मीनारायण त्रिपाठी हिच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे व्यवस्था होत होती. वयाने ज्येष्ठ तृतीयपंथी नंतर आला तर खुर्चीवर बसलेल्या तरुण तृतीयपंथीयांनी त्यांना जागा करून दिली. खुच्र्या कमी पडल्यावर खाली पायऱ्यांवर बैठक मारली.
या मेळाव्यासाठी प्रवेशद्वारापासून थेट व्यासपीठापर्यंत प्रतिष्ठानचे अवघे सभागृह रंगी-बेरंगी फुलांची सुंदर सजावटीने नटले होते. अवघ्या सभागृहाला हेलावणाऱ्या जोगव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर ‘अॅमस्टरडॅम’ला जाऊन महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या तृतीयपंथीयांच्या पथकाने बहारदार लावणीनृत्य सादर केले. नृत्यातील कसब, अदाकारी पाहून अवघे सभागृह लावणीच्या रंगात बेधुंद झाले.
त्यानंतर झालेल्या भाषणांत गौरी सावंत, ऊर्मिला तसेच थेट पीएच. डी. मिळवणाऱ्या डॉ. सबिना फ्रान्सिस या तृतीयपंथीयाने आपल्या समाजाच्या अडीअडचणी अत्यंत मुद्देसूदपणे मांडल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे लोटली, पण त्यांच्या आयुष्यातील काळरात्र अद्यापही सुरूच होती. इतर सर्व वंचित-शोषितांना प्रगतीच्या संधी मिळाल्या, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, पण तृतीयपंथीय आणि जोगत्यांना ही संधी तर सोडा साधा जगण्याचा अधिकारही मिळत नव्हता. अशावेळी सरकारच्या या मेळाव्याने त्यांना प्रथमच आयुष्यात आशेचा किरण दिसला. त्याबद्दल कृतज्ञतेची भावना दिसत होती. या वक्त्यांनी आपल्या भाषणात या भावनेला वाट करून दिली.
सभा-संमेलनाचे नेटके संयोजन, उत्कृष्ट सादरीकरण, मुद्देसूद भाषणे ही पांढरपेशा समाजाची मिरासदारी नाही. तृतीयपंथीयही हे सहजपणे करू शकतात, गरज आहे ती फक्त समान संधी मिळण्याची हेच वास्तव हा मेळावा सतत अधोरेखित करत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा