बनावट आदेशाद्वारे बदली करून घेणाऱ्या व नियमानुसार बदली होत नसतानाही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बदली मिळवलेल्या २१ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याची शिक्षा जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी बजावली. त्यामुळे मागील ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या या बनावट बदली घोटाळ्यावर पडदा पडला.
बीड जि. प.मध्ये प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने व समुपदेशाने झाली. त्यानंतरही यादीत नाव नसताना किंवा विनंती अर्ज नसताना काही शिक्षकांच्या बदल्या झाल्याची तक्रार थेट आयुक्तांपर्यंत झाली. दरम्यान, प्रभारी ‘सीईओ’ डॉ. कोल्हे यांनी माजलगावच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना या बदल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश बजावले. अंधारे यांनी अहवाल सादर केल्यानंतर १७ शिक्षकांनी नियमात नसताना अधिकाऱ्यांशी संगनमत करून, तर काहींनी कुठेही नोंद नसलेले बदली आदेश मिळवून बदल्या करून घेतल्याचे उघडकीस आले. चौकशीत २१ शिक्षक या प्रकरणात आढळून आले. या प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी सुखदेव सानप, शिक्षण विभागातील लिपिक व काही कर्मचाऱ्यांबाबतीत मोठय़ा प्रमाणात चर्चाही झाली. शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांनीच पत्रकार बैठक घेऊन या चुकीच्या बदल्या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. परिणामी शिक्षणाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले, तर लिपिकाला निलंबित करण्यात आले. त्यानंतरही या प्रकरणात नेमके काय होईल याची चर्चा होतीच. संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काहींनी लावून धरली होती. त्यामुळे अखेर डॉ. अशोक कोल्हे यांनी २१ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याची शिक्षा दिली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा