नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान संयुक्त परिसर तसाही पर्यटकांना निराशा देण्यारे हक्काचं ठिकाण बनले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, मात्र हा परिसर ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या वन्यजीव विभागालाही पर्यटक आणि पर्यटनाशी काहीही देणे घेणे नसल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. याचे मुख्य उदाहरण म्हणजे, गवत व कचऱ्याने भरलेले हिलटॉप गार्डन स्वच्छ करण्याची तत्परताही या विभागाने दाखविलेली नाही.
एक काळ असा होता की, हिलटॉप गार्डन हे येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र होते; परंतु काही प्रशासकीय व तांत्रिक बाबीसमोर करून सुमारे पंधरा वर्षांपासून या गार्डनकडे वन्यजीव विभागाने दुर्लक्ष केले आहे. एकेकाळी वैभवात असणारे हे गार्डन गेल्या वर्षांपर्यंत धूळखात पडलेले होते. मागील वर्षी मात्र, वनसंरक्षक रेड्डी यांनी या गार्डनचे नूतनीकरण करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी विविध विभागांचे अधिकारी, जनप्रतिनिधी, निसर्ग मित्र यांच्याशी संवाद साधून कामाला सुरुवात केली. उद्यानाची दुरुस्ती, रंगरंगोटी, गेट उभारणे, लाईट लावणे आदी कामे काही प्रमाणात करण्यात आलीत. रेड्डी यांची बदली झाल्यानंतर हे काम मात्र ठप्प झाले; परंतु या उद्यानाला एक नवीन लुक आला. पर्यटकही आनंदून गेले होते. एवढेच नव्हे, तर काही निसर्गप्रेमींनी विविध प्रकारची सुमारे ३०० झाडे या गार्डनला दान केली होती.
परंतु गेल्या पावसाळ्यापासून या गार्डनकडे स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण गार्डनमध्ये कचरा आणि गावराण गवताचे साम्राज्य पसरले आहे. माणसापेक्षा उंच झालेल्या या गवतात शोभेची झाडे मात्र गडप झाली आहेत. दिवाळीच्या दरम्यान थोडासा कचरा साफ करण्याचे काम केल्याचे दिसून येते; परंतु अजूनही ७५ टक्के भाग मात्र कचऱ्याच्याच विळख्यात आहे. या गार्डनच्या नूतनीकरणाचे बंद पडलेले काम सुरू करण्याचे स्वारस्य तर कुणी दाखवलेच नाही. उलट, येथे कामावर असलेले मजूर दुसरीकडे हलविण्यात आले आहेत. कित्येक दिवसांपासून येथील शोभेच्या झाडांना पाणी न दिल्यामुळे ती सुकत आहेत, तर फुलझाडांची चोरी झाली आहे, मात्र ही बाब कुणाच्याच लक्षात अजूनपर्यंत कशी आली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वास्तविक, काही मजूर लावून हे साफसफाईचे काम संबंधित विभागाला करता आले असते; परंतु इच्छाशक्तीअभावी हे होऊ शकले नाही. आता येथे पर्यटकांचे येणे सुरू झाले आहे. पर्यटक येतात व शिव्यांची लाखोली वाहून जातात. याच्याशी वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना काहीही देणेघेणे उरले नसल्याचे दिसते. हिलटॉप गार्डनच्या सुरू झालेल्या कामाने परिसरातील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली होती; परंतु, कचऱ्याच्या विळख्यात असलेली बाग पाहून आता संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा